
Ratnagiri News वातावरणातील बदलांमुळे (Climate Change) हापूसचे उत्पादन (Hapus Mango Production) पंधरा टक्केच राहील, यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचा परिणाम शेवटच्या टप्प्यातील आंबा प्रक्रिया उद्योगावर (mango Processing Indusrty) होणार आहे.
देश-विदेशातील खवय्यांना आमरसाची गोडी चाखण्यासाठी अधिक दाम द्यावे लागणार आहेत. कॅनिंगसाठी (Mango For Canning) हापूस मिळणे दुरापास्त होणार आहे.
कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यासाठी दुप्पट दर प्रक्रियादारांना द्यावा लागतील. परिणामी प्रक्रिया उद्योगातील गुंतवणुक वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस, अति उष्णता, असंतुलित वातावरण या सर्वांचा परिणाम कोकणातील आंबा उत्पादनावर झाला आहे.
उष्णतेमुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याचीही मोठी गळ झाली आहे. त्यामुळे कॅनिंगला अपेक्षित आंबा मिळणे अशक्य आहे. उत्पादन अवघे पंधरा टक्केच राहील. त्यामुळे बाजारातील आंब्याचे दर चढे आहेत.
पाच डझनाच्या पेटीला पाच हजार रुपये मोजावे लागतात. डागी आंबाही चांगल्या दराने विकला जात असल्यामुळे कॅनिंगसाठी आंबा कमी पडणार आहे. किलोने आंबा विक्रीसाठी व्यावसायिकच तयार नाहीत. त्यामुळे कॅनिंगचे दर वाढणार आहेत.
गतवर्षी ३० रुपये प्रतिकिलोने आंबा खरेदी होत होता. यंदा तोच दर प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर गेला आहे. उत्पादन कमी असल्यामुळे कॅनिंगसाठी पाहिजे तेवढा कच्चा माल प्रक्रिया उद्योगांना मिळविताना कसरत करावी लागणार आहे.
आंबा प्रक्रियेसाठी आवश्यक माल मिळत नसल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. याचा फटका जिल्ह्यातील अनेक प्रक्रिया उद्योगांना बसणार आहे. हापूसच्या आमरसाचा ३ किलोचा डबा सुमारे ५०० ते ६०० रुपयांना मिळत होता.
तो १५० ते २५० रुपयांनी वाढू शकतो, असा अंदाज आहे. सध्या प्रक्रिया उद्योजकांपुढे भांडवल उभारणीचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी बँकांनी आवश्यक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खवय्यांच्या हौसेला मुरड
यंदा हापूस आंबा परिपक्व झाला तरी वधारलेल्या दरामुळे खवय्ये हौसेला मुरड घालत आहेत. यंदाची अक्षय तृतीया हापूसच्या आमरसावर ताव मारून साजरी करणे दुर्मिळच होणार आहे.
पुरणपोळीचे सुग्रास जेवण व आमरसाच्या पंगतीची सुरवात याच दिवसापासून होते. यंदा सणासुदीला पुरेशा प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध नसल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योगावर दृष्टिक्षेप...
* जिल्ह्यातील प्रकियादार ः १७५
* हापूस आंब्याचे एकूण उत्पादन ः दीड लाख मेट्रिक टन
* प्रक्रिया होणारा आंबा ः सुमारे ५० हजार मेट्रिक टन
* स्थानिक पातळीवरील प्रक्रिया ः २० हजार मे. टन
* परजिल्ह्यात प्रक्रिया होणारा आंबा ः ३० हजार मे. टन
* प्रक्रिया उद्योगातील सर्वसाधारण उलाढाल ः सुमारे ५०० कोटी रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.