
Buldhana Crop Damage ः अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने जाहीर करूनही केवळ माहिती अपडेट होत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. काही कर्मचारी संघटनांकडून माहिती अद्ययावत करण्याच्या कामास असहकार्य केले जात असल्याने प्रशासनापुढे पेच तयार झालेला आहे.
दुसरीकडे मंगळवारी (ता. ७) याबाबत बैठक घेत जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड (Collector Dr. h. P. Tummod) यांनी संघटनांना या कामाबाबत शुक्रवार (ता.१७) पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. संघटनांकडून हे काम करण्याबाबत होकार मिळाल्याने शेतकऱ्यांचा रखडलेला पैसा खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. जमिनही खरडून गेली होती. यासाठी शासनाने मदतीची घोषणा केली. जिल्ह्यातील लाखावर शेतकऱ्यांना मदतीसाठी सुमारे १७४ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.
ही रक्कम थेट शासनाकडून खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांच्याकडे माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने सोपवली होती.
मात्र, आपल्याकडील कामाचा ताण पाहता तसेच हे काम महसूल यंत्रणाच आजवर करीत आलेली असल्याने ग्रामसेवक संघटनेने नकार दर्शवला होता. यातून काही तालुक्यात ग्रामसेवकांकडील माहिती अद्यापही अद्ययावत झालेली नाही.
शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी घोषणा करूनसुद्धा केवळ माहितीअभावी ही रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. यात जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक विलंब झालेला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.