Rain Update : पावसाचा कोकणात जोर

कोकण किनारपट्टीवर जोरदार बरसणारा पाऊस, राज्यात मात्र कमजोर असल्याचे चित्र आहे. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
Heavy Rains
Heavy RainsAgrowon

पुणे : कोकण किनारपट्टीवर जोरदार बरसणारा पाऊस (Heavy Raifall), राज्यात मात्र कमजोर असल्याचे चित्र आहे. कोकणात पावसाचा जोर (Rain Force) कायम राहणार असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. आज (ता.२) कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

पश्चिम मध्य अरबी समुद्रात सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण गुजरातपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाब पट्टा सक्रिय आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य राजस्थानपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यातच उत्तर ओडिशा आणि परिसरावर सोमवारपर्यंत (ता. ४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

कोकण, विदर्भातही ढगांची दाटी झाली असून, उर्वरित राज्यात ऊन-सावल्याचा लपंडाव सुरूच आहे. पावसाची उघडीप असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. शुक्रवारी (ता. १) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग येथे जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पुढील तीन ते चार दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सून दोन दिवसांत देश व्यापणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास वेगाने सूरू आहे. राजस्थान आणि गुजरातचा भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून पोचला आहे. शुक्रवारी (ता. १) मॉन्सूनने संपूर्ण पंजाब, हरियानासह राजस्थानच्या आणखी काही भागात मजल मारली आहे. दोन दिवसांत मॉन्सून राजस्थान आणि गुजरातसह संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com