Rain Alert:कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

पालघर, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.
Weather Forecast
Weather ForecastAgrowon

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस काहीसा ओसरण्याची शक्यता आहे. आज (ता. ११) कोकण व मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यासह, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा (Monsoon) आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र, मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्र ते पूर्व-मध्य बंगाल उपसागर पर्यंत विस्तारले आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे.

पश्चिम बंगाल आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्र, अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाब क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यासह पूरक प्रणालीमुळे राज्यात वाढलेला पाऊस काहीसा ओसरण्याची चिन्हे आहेत.

आज (ता. ११) कोकणातील रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येऊन मध्य प्रदेश आणि परिसरावर सक्रिय आहे. या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. यातच सौराष्ट्र आणि लगतच्या अरबी समुद्रात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पश्चिमेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. १३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

जोरदार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट) :रायगड, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com