Crop Damage
Crop DamageAgrowon

Rain Update : खानदेशात पावसाचा धुमाकूळ

खानदेशात मागील तीन-चार दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कापूस, सोयाबीनची अतोनात हानी झाली असून, शेतकरी चिंतेत आहेत.

जळगाव ः खानदेशात (Khandesh rain Update) मागील तीन-चार दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कापूस, सोयाबीनची अतोनात हानी (Soybean Crop Damage) झाली असून, शेतकरी चिंतेत आहेत. तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करून मदतीचा हात शेतकऱ्यांना द्यावा, ऐन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पावसाने पिके हातची गेल्याने शेतकरी वित्तीय अडचणीत आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, जळगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा, बोदवड, धरणगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा भागातील ५० महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे.

Crop Damage
Soybean Crop Damage : पावसाचे पुनरागमन सोयाबीनसाठी मारक

चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर-डोंगरी नद्यांना पूर आला आहे. कजगाव (ता. भडगाव) परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. गुरुवारी (ता. ६) व शुक्रवारी (ता.७) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची हानी झाली आहे. पाचोरा शहर व परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, यामुळे तोंडाशी आलेला खरीप पिकांचा घास नष्ट झाला आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात अडकला आहे.

पारोळ्यात अतिवृष्टीने हानी

पारोळा तालुक्यातील पाचही मंडलांत मुसळधार पाऊस झाला. अनेक शेतांत पाणी साचून कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तालुक्यात १२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस शेळावे मंडलांत ४२ मिलिमीटर, तर सर्वांत कमी पारोळा मंडलात १३ मिलिमीटर झाला आहे. चोरवड ३५ मिमी, तामसवाडी १८ असा पाऊस झाला आहे.

Crop Damage
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीवर पावसाचं सावट ?

शिरपुरला मुसळधार पावसाने झोडपले

धुळ्यातील शिंदखेडा, साक्री, धुळे व शिरपूर शहर आणि परिसराला वादळासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दिवसा व रात्री झालेल्या पावसाने शेतातील पिके जमीनदोस्त केली. नांदर्डे (ता. शिरपूर) येथे वीज पडून लक्ष्मण मंजा पावरा यांच्या दोन म्हशी व एक बैल ठार झाला.

कपाशी आडवी झाली. भोरखेडा (ता. शिरपूर) परिसरात कणसांत दाणे भरलेले बाजरीचे पीक मोडून पडले. बोराडी व सांगवी मंडलात विक्रमी पाऊस झाला असून, मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पिकांची अधिक हानी झाली आहे.

शिरपुरात विक्रमी पावसाची नोंद

६० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास ढगफुटी झाल्याचे मानले जाते. शिरपूर तालुक्यातील सांगवी मंडलात ८० मिमी, तर बोराडी मंडळात ६८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हा यंदाच्या पावसाळ्यातील विक्रम आहे. महसूल विभागातर्फे दिवसभरात हानीचा आढावा घेण्याचे काम सुरू होते. मंडळनिहाय झालेला पाऊस व कंसात आतापर्यंतचा पाऊस असा : शिरपूर ४३ मिमी (७४४ मिमी), थाळनेर ४५ मिमी (१२१८ मिमी), होळनांथे ३८ मिमी (७१९ मिमी), अर्थे ४६ मिमी (६८२ मिमी), जवखेडा १४ मिमी (८१२ मिमी), बोराडी ६८ मिमी (८१८ मिमी), सांगवी ८० मिमी (६२९ मिमी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com