Rain Update : विदर्भासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार

मॉन्सूनच्या पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी (ता. ९) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : मॉन्सूनच्या (Monsoon) पावसाने कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात धुमाकूळ (Heavy Rainfall In Vidarbh) घातला आहे. मंगळवारी (ता. ९) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा येथे सर्वाधिक ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी २०० मिलिमीटपेक्षा अधिक पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही मुसळधार पावसाने (Rainfall) दमदार हजेरी लावली. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झाल्याचे दिसून आले.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरात वाहून गेल्याने, तसेच इतर अपघाताच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात काही मार्गावरील वाहतूक ही प्रभावित झाली आहे. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वरूड जहागीर येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी दांपत्यांचा मृत्यू झाला.

Rain Update
Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरला आहे. मात्र अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. परंतु नद्यांच्या पाणीपातळीत घट झाल्यामुळे पुराचा धोका टळला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने मंगळवारीही (ता. ९) धुमाकूळ घातला. किनारी भागात वादळी वारे वाहत होते. वाशिष्ठी, जगबुडी, बावनदी, काजळी, अर्जुना नदीची पाणीपातळी कमी झाली होती.

खानदेशात रविवारी (ता. ७) रात्री व सोमवारी दिवसभर आणि रात्रीदेखील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हलक्या, मुरमाड जमिनीत पिकांना पावसाने जीवदान मिळाले. तर काळ्या कसदार जमिनीत सखल भागात पिकांत पाणी साचले. काही भागांत नाल्याकाठी शेतकऱ्यांच्या जमिनीही खरडून गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात सटाणा व मालेगाव तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यात पावसाने तुफान फटकेबाजी केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढ्या-नाल्यांना पूर पाणी आल्याने शेतजमिनींसह पिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपाच्या पिकांसह डाळिंब, पूर्वहंगामी द्राक्ष बागांना फटाका बसणार आहे.

Rain Update
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

पुणे जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. वीर, भामा आसखेड दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

कोल्हापुरात ७१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंगळवारी (ता.९) दुपारपर्यंत सुरूच राहिला. जोरदार पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी पात्रांबाहेर पडले आहे. विविध नद्यांवरील एकूण ७१ बंधारे दुपारी दोन वाजेपर्यंत पाण्याखाली गेले. पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बहुतांशी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

कोकण :

लांजा ३३०, तळा २१०, म्हसळा १९०, मंडणगड १७०, माणगाव १६०, संगमेश्वर, पेण, चिपळूण प्रत्येकी १४०, रोहा, रत्नागिरी, दापोली, माथेरान, सुधागड प्रत्येकी १३०, महाड, वाकवली, पोलादपूर, सांताक्रूझ, मुरूड, श्रीवर्धन प्रत्येकी १२०, खेड, वसई प्रत्येकी ११०, खालापूर १००, हर्णे ९०, ठाणे, कर्जत, वैभववाडी प्रत्येकी ८०, कल्याण, अंबरनाथ, शहापूर, राजापूर प्रत्येकी ७०, ठाणे, उल्हासनगर प्रत्येकी ६०.

..........

मध्य महाराष्ट्र :

राधानगरी २००, महाबळेश्‍वर १९०, शाहूवाडी १५०, लोणावळा १४०, कोपरगाव १२०, आजरा, वेल्हे प्रत्येकी ८०, चोपडा, पाटण, कागल, प्रत्येकी ७०, कोल्हापूर ६०, मालेगाव, पन्हाळा, पौड, नांदगाव, भुसावळ, प्रत्येकी ५०, हातकणंगले, शिरोळ प्रत्येकी ४०, जळगाव, भोर, गडहिंग्लज, एरंडोल, सातारा, चाळीसगाव, नेवासा, पारोळा, शिरूर, वडगाव मावळ, सटाणा, बागलाण, दिंडोरी, शिरपूर, कळवण, मिरज, देवळा, चिंचवड, कडेगाव, वाळवा, सांगली प्रत्येकी ३०.

.....

मराठवाडा :

औरंगाबाद, कन्नड, लोहारा, भोकरदन प्रत्येकी ३०.

.....

विदर्भ :

भंडारा १४०, ब्रह्मपुरी १३०, सडक अर्जुनी, वाशीम, नरखेडा प्रत्येकी १००, आरमोरी, मुलचेरा, भिवापूर प्रत्येकी ९०, मोहाडी, देसाईगंज प्रत्येकी ८०, कुही, सावळी, गडचिरोली, गोंडपिंपरी, पवनी, धानोरा, मुल, मालेगाव, भामरागड, नागभीड, लाखणी, अहिरी, देवरी प्रत्येकी ७०, चामोर्शी, अर्णी, चिखलदरा, वरूड, साकोली, आष्टी, सेलू, मेहकर, प्रत्येकी ६०.

....

घाटमाथा :

डुंगुरवाडी, दावडी प्रत्येकी २७०, भिरा २५०, शिरगाव २१०, ताम्हिणी २००, अंबोणे १९०, कोयना पोफळी १६०, लोणावळा १२०, कोयना नवजा ११०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com