
कोल्हापूर : पदरी आलेले अपंगत्व (Disability) स्वीकारून जिद्दीने काम करण्याची त्यांची धडपड सर्वसामान्यांनाही लाजवते. व्यंगाचा बाऊ न करता त्यांची शेतकामे (Agriculture work) धडाधड सुरू असतात. शारीरिक अपंगत्वामुळे (Physical Disability) मर्यादेची जाणीव असली तरी मानसिकदृष्ट्या कणखर असल्याने ते आजही सुखकर आयुष्य जगत आहेत.
कुणी सहचारिणीच्या साथीने तर कोणी मुलांच्या साथीने आपली शेतकामाची वाटचाल सुरूच ठेवली. शेतीतील हे वीर नक्कीच इतरांना प्रेरक ठरत आहेत. शनिवारी (ता. ३) साजरा होणाऱ्या अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर अशाच काही शेतकऱ्यांचा घेतलेला हा धांडोळा.
सात गायी सांभाळताहेत मांगनूरचे शंकर पाटील
मांगनूरचे (ता. कागल) शंकर पाटील वय वर्षे ५५. लहानपणीच पोलिओ झाला आणि डाव्या पायाचे कार्य थंडावले. आता आयुष्यभर हे व्यंगत्व घेऊन जगायचे कसे असा प्रश्नच होता. पण शंकर पाटलांनी वस्तुस्थिती स्वीकारली आणि जेवढे शक्य आहे तेवढे काम करत आयुष्य सार्थकी लावले. दोन एकर शेती करत सात गायींसाठी सांभाळ केला. आज त्यांच्या गोठ्यातून सुमारे २५ लिटर दुधाची विक्री होते.
गावातील ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे सचिव म्हणूनही ते काम पाहतात. एक पाय अपंग झाला म्हणून कुठे अडले नाही. काही ठिकाणी आपण सर्वसामान्यपणे चालू शकत नाही अशी जाणीव झाली. पण ती तात्पुरती ठरली. जे अवयव सुदृढ आहेत त्याचा आधार घेऊन शक्य ती सर्व कामे करण्याचा प्रयत्न केला आणि आज ते यशस्वी शेतकरी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नी कांचन त्यांना सावलीसारखी साथ देत आहेत. यातूनच या शेतकरी दांपत्याचा संसार सुखाने सुरू आहे.
कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील आनंदा पाटील. शेती केवळ चार गुंठे. डाव्या पायापासून जन्मताच अपंग. पण पाटलांनीही अपंगत्व स्वीकारले. केवळ दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण झाले आणि शिक्षण थांबले. अपुरी जनावरे असल्यामुळे दोन जनावरांचे संगोपन केले. चार गुंठ्यांतील ऊस शेतीची सगळी कामे ते करतात.
भांगलण, शेतीला पाणी देणे याबरोबरच वैरण कापण्याचे काम ही त्यांच्याकडे असते. कापलेली वैरण जनावरापर्यंत नेण्यासाठी पत्नी व मुलांचा आधार घेतला जातो. त्यांच्या आधारावर संसार सुखाचा सुरू आहे. सत्य स्वीकारून शक्य तितकी कामे करण्याची जिद्द त्यांना आयुष्य जगण्याची प्रेरणा देत आहे. अल्पभूधारक म्हणून जगत असतानाही आनंदा पाटील सुखी समाधानी आहेत. व्यंगत्वाचा लवलेश ही त्यांच्या आनंदाला गालबोट लावू शकत नाही.
कुंडलिक इंदूलकरांची निःस्वार्थी समाजसेवा
मुरुक्टे (ता. भुदरगड) येथील कुंडलीक पांडुरंग इंदूलकर यांची पूर्ण डावी बाजू अधू आहे. पण ते आज एक क्षणही स्वस्थ बसत नाहीत. स्वतःची बैल जोडी आहे. अपंगत्वामुळे स्वतःच्या शरीराचा बॅलन्स राहत नसला, तरी बैल जोडी चालवताना मात्र त्यांचे हे अपंगत्व कुठेच आडवे येत नाही. स्वतःच्या शेतीतील छोटी मोठी कामे ते पत्नी छाया यांच्या मदतीने करतात. त्यातूनच त्यांची गुजराण होते. छाया यांची साथ त्यांच्या आयुष्याला सुखावणारी ठरली आहे. एक विवाहित मुलगी व छोटा मुलगा यांचा कुटुंब नक्कीच एक वेगळ्या वाटेवरच आहे.
केवळ स्वतः शेतीकामे करून ते थांबत नाहीत. तर अन्य अपंग व्यक्ती, विधवा, परित्यक्ता आदींसाठी ज्या शासनाच्या योजना असतात त्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी निःस्वार्थीपणे काम करतात. अपंगत्व म्हटलं इतरांना भार असा एक समज असतो, पण कुंडलिक यांच्याकडे पाहिलं की हा समज खोटा ठरतो. अपंगत्व असले तरी माणसाची जगण्याची काही तरी करण्याची जिद्द किती महत्त्वाची आहे हे दिसून येते. स्वतःच्या अपुरेपणाची जाणीव दूर ठेवून दुसऱ्याला मदत करण्यासारखा त्यांचा स्वभाव आणि निश्चितच प्रेरणादायी आहे
दिव्यांगांपर्यंत योजना पोहोचाव्यात
शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असले तरी मनाने खंबीर असलेले असे अनेक शेतकरी आज आपापल्या पद्धतीने शेतीकामे करत आहेत. अशा शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोचवून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. अशा योजनांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.