
Crop Damage Survey Report : गेल्या खरीप हंगामात नाकारलेल्या पूर्वसूचनांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यानंतर रब्बीचाही हंगाम (Rabi Season) आटोपला. त्यानंतर शेतात पीकच नसताना या पूर्वसूचनांची पडताळणी कशी करणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
गेल्या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी १ लाख १५ हजार २२३ व काढणीपश्चात नुकसान यासाठी ९ हजार २२४ अशा एकूण १ लाख २४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पीकविमा कंपनीला प्राप्त झाल्या होत्या.
त्यापैकी २४ हजार ८५५ पूर्वसूचना अर्ज कंपनीकडून विविध कारणे सांगत नाकारण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक संघटनांनी या विरोधात आंदोलने केली.
दरम्यान, प्रशासनाने नमते घेत सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या पूर्वसूचना ग्राह्य धराव्यात व पडताळणी करावी, असे निर्देश दिले. अन्यथा गंभीर कारवाईचा इशारा देखील विमा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्याची दखल घेत विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकांनी थेट अमरावती गाठत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्याच वेळी कृषी आयुक्तालयानेही पीकविमा कंपनीला पत्र देत सर्व पूर्वसूचना ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले होते. मात्र कंपनीस्तरावर याबाबत कुठल्याही सूचना काढण्यात आल्या नाहीत.
आता पुन्हा याविषयी पीकविमा कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत. परंतु खरीप नंतर रब्बी हंगाम संपला आणि आता नव्या हंगामाच्या तयारीत शेतकरी गुंतले आहेत. परिणामी शेतात पीकच नसल्याने पूर्वसूचनांची पडताळणी कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तांत्रिक आधारावर मिळणार भरपाई
शेतात पीक नसल्याने पडताळणी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ७२ तासांत अर्ज प्राप्त झाला का, त्या भागात पावसामुळे झालेले नुकसान, शेतकरी योजनेत समाविष्ट आहे का, ज्या पिकाचे नुकसान झाले, त्याबाबतची पूर्वसूचना देण्यात आली का, अशा तांत्रिक बाबी विचारात घेत पडताळणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
तालुकानिहाय नाकारलेले अर्ज
अचलपूर...८३६
अमरावती...२३४५
अंजनगावसूर्जी...७६५
भातकुली...२०४१
चांदूररेल्वे...७८३
धारणी...२२१
मोर्शी...२१६३
नांदगाव खंडेश्वर...७१८३
तिवसा...१७०१
वरुड...१६४३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.