Agrowon Exhibition : शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद

महिला शेतकऱ्यांचे एकामागोमाग येणारे गट, शेती अवजारांसह ड्रोनची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली तोबा गर्दी लक्ष वेधून घेत होती.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon

औरंगाबाद : अत्याधुनिक ड्रोन, (Agriculture Drone) मशागतीची अवजारे, (Agriculture Machinery) बी-बियाणे, खतांपासून ते शेतीमधील सारे काही एकाच छताखाली आणण्याची किमया साधणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या राज्यव्यापी कृषी प्रदर्शनाला (Agrowon Agricultural Exhibition) दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला. कोकणापासून ते दुर्गम गडचिरोलीपर्यंतच्या शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला हजेरी (Display Farmer's Choice) लावत कृषी ज्ञानसोहळ्यात सहभाग दर्शवला.

महिला शेतकऱ्यांचे एकामागोमाग येणारे गट, शेती अवजारांसह ड्रोनची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली तोबा गर्दी लक्ष वेधून घेत होती. मजूरटंचाईवर प्रभावी उपाय सांगणाऱ्या आधुनिक कृषी अवजारे व उपकरणांसह विविध कृषी उत्पादनांच्या स्टॉल्सवर तरुण शेतकरी पुत्रांची झुंबड उडालेली होती.

दुसऱ्या बाजूला अभ्यासू शेतकऱ्यांनी चर्चासत्राला गर्दी केलेली होती. अभ्यासक व तज्ज्ञांना गराडा घालत आपल्या नाना शंकांचे निरसन करीत टिपण घेणारे शेतकरी, असे उत्साहवर्धक वातावरण शनिवारी (ता.१४) प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दिसत होते.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी दर १५ मिनिटांनी लकी ड्रॉ काढला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपयोगी विविध साधनांची भेट मिळत होती. सर्व स्टॉल्स गर्दीने फुलले. तरुण शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उत्सुकतेने समजावून घेत होते.

मराठवाड्यासह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नंदूरबार, धुळे, ठाणे, पालघरसह अगदी पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, नाशिक यांसह राज्याच्या चारही दिशांकडून या प्रदर्शनाला अभ्यासू शेतकरी हजेरी लावत आहेत. काही शेतकरी दोन दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीने आलेले होते.

Agricultural Exhibition
Agrowon Exhibition : अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास औरंगाबादेत शानदार प्रारंभ

‘शेती क्षेत्र हा समस्येचा सागर असतानाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना समृद्धीच्या तिराकडे नेण्याची किमया साधणारे हे प्रदर्शन आहे,’ असा संदेश या प्रदर्शनाला भेट देणारे कृषी शास्त्रज्ञ व संशोधक देत होते.

प्रदर्शनातील ‘आत्मा’च्या दालनात ग्रामीण भागातील महिला शेतकरी तसेच बचत गटांच्या महिला दिसत होत्या. ‘बसवंत गार्डन’च्या फळ प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्यादेखील दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढली.

फळांचा राजा स्पर्धेसाठी ‘बसवंत गार्डन’कडून राज्यभरातील शेतकऱ्यांकडून चिकू, संत्रा, स्ट्रॉबेरी, बोर, सीताफळ मागविण्यात आले होते. स्पर्धेसाठी आलेली अतिशय आकर्षक व गुणवत्तापूर्ण फळे सर्वांना मोहित करीत होती. त्यातून अनेक शेतकरी तसेच ग्राहक एकमेकांशी जोडले जात होते.

ड्रोन, उच्च तंत्रज्ञानावर आधारित कृषी उत्पादने तसेच देशी-विदेशी अवजारे व यंत्रांच्या स्टॉल्सवर तरुण शेतकरी रेंगाळत होते. उत्पादनाच्या चाचणी अहवालापासून ते बॅंक कर्ज, देखभाल व दुरुस्तीची माहिती ते बारकाईने जाणून घेत होते.

शेतकऱ्यांची गर्दी पाहून प्रदर्शनातील स्टॉल्सधारक, कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील खूष दिसत होते. “मातीत राबणारे आणि माहितीची आस लागलेले शेतकरी या प्रदर्शनाला गर्दी करीत आहेत.

आम्ही ज्या हेतूने प्रदर्शनात सहभागी झालो तो हेतू सफल होत असल्याचा आनंद आम्हाला ‘अॅग्रोवन’मुळे मिळतो आहे,” अशा प्रतिक्रिया स्टॉल्सधारकांकडून येत होत्या.

नवतंत्रज्ञानाची आस

प्रदर्शनाच्या मुख्य डोममध्ये अलोट गर्दी झालेली होती. देशातील व राज्यातील विविध कृषी संशोधन संस्था, कृषी संबंधित सरकारी व निमसरकारी विभाग, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे व ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील कंपन्या काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, ड्रीप, टिश्युकल्चर अशा विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या स्टॉल्सवर माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. जणू या तंत्रज्ञानाची आस शेतकऱ्यांना लागल्याचे दिसत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com