
Abdul Sattar Latest News : कृषी खात्यातील (Agriculture Department) निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदासाठी अचानक झालेल्या संशयास्पद बदल्यांचे गूढ आता उकलले आहे.
शासनाच्या नागरी सेवा मंडळातील दोन आयएएस अधिकाऱ्यांचा स्पष्ट विरोध असतानाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी लेखी आदेश देत नवा गुणनियंत्रण संचालक नेमण्यास भाग पाडल्याचे गोपनीय कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे.
गुणनियंत्रण संचालकपदी शासनाने दिलीप मारुती झेंडे यांची नियुक्ती २०२० मध्ये केली होती. ते बदलीस पात्र नव्हते. मात्र राज्य शासनाने गेल्या महिन्यात अचानक त्यांची बदली केली व विकास षण्मुख पाटील यांची नियुक्ती संचालकपदी केली. मुळात, पाटील हे विस्तार संचालकपद सांभाळत होते.
तेदेखील बदलीस पात्र नव्हते. मात्र तरीही या दोघांच्या बदल्या करीत त्यांना एकमेकांच्या पदावर पाठविले गेले. यामुळे कृषी विभागात तर्कवितर्काला आलेले उधाण अद्यापही शमलेले नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या बदल्या थेट कृषिमंत्र्यांनी दबाव टाकून केल्या आहेत. मंत्र्याला थेट बदली करता येत नाही. त्यासाठी नागरी सेवा मंडळाची शिफारस लागते.
सत्तार यांनी थेट या मंडळावरच दबाव आणल्याचे दिसून येते. नागरी सेवा मंडळात प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, अपर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार व कृषी आयुक्त सुनील चव्हाण असे तीन ज्येष्ठ सनदी अधिकारी होते.
मात्र कृषी आयुक्त मंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. उर्वरित, डवले व अनुप कुमार या दोघांनाही या बदल्या गैर वाटत होत्या.
त्यामुळे दोघांनीही या बदल्या करणे शक्य नसल्याचे लेखी नमूद करीत मंत्र्यांच्या सूचनेमुळे बदल्या केल्या जात असल्याची नोंद राज्य शासनाच्या कागदपत्रांमध्ये केली आहे.
श्री. डवले व अनुप कुमार यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या घडामोडींचा अर्थ असा निघतो आहे, की ‘बदल्यांचा कायदा २००५’ अनुसार पाटील व झेंडे यांना त्यांच्या पदावर तीन वर्षे पूर्ण झालेली नाहीत.
त्यामुळे त्यांच्या बदल्या होऊ शकत नाहीत. मात्र कृषिमंत्र्यांनी विकास पाटील यांची बदली निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी झेंडे यांच्या जागी करण्यास सांगितले आहे.
झेंडे यांना विस्तार संचालकदेखील न ठेवता त्यांना कृषी परिषदेत पाठवावे, असे लेखी आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. पाटील यांना गुणनियंत्रण संचालक कराच; पण त्यांना विस्तार संचालकाचाही अतिरिक्त कार्यभार द्यावा, असे मंत्र्यांचे पत्र आहे.
दरम्यान, डवले व अनुप कुमार यांनी कृषिमंत्र्यांचा अर्धा आदेश झुगारला आहे. “कृषी विभागात गुणनियंत्रण आणि विस्तार असे दोन्ही प्रशासकीय विभाग महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विस्तार संचालकपद अतिरिक्त कार्यभाराद्वारे चालविणे उचित होणार नाही. पाटीलदेखील बदलीस पात्र नाहीत.
परंतु कृषिमंत्र्यांचा आदेश विचारात घेता पाटील यांना गुणनियंत्रण संचालक नेमावे, पण विस्तार विभागाचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये. विस्तार संचालकपद पूर्णवेळ झेंडे यांच्याकडे ठेवावे, असा निर्णय नागरी सेवा मंडळाने दिला. त्यामुळेच झेंडे सध्या विस्तार संचालकपदी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील सिल्लोड महोत्सवासाठी कोट्यवधी रुपयांच्या प्रवेशिका छापण्यात आल्या होत्या. या प्रवेशिका गुणनियंत्रण विभागाने विकाव्यात, असा दबाव झेंडे यांच्यावर आणला जात होता.
मात्र काहीही झाले तरी आपण हे काम करणार नाही, अशी भूमिका झेंडे यांनी घेतली होती. त्यामुळे सिल्लोड महोत्सवाच्या आयोजकांना नुकसान झाले होते. या प्रकरणाचा राग ठेवत झेंडे यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
‘...तर सरकार तोंडावर आपटेल’
दुसरी धक्कादायक बाब म्हणजे, कृषिमंत्र्यांनी गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदी पाटील यांना नेमण्यास भाग पाडले असले, तरी त्यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे प्रकरण मंत्रालयात पडून आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आलेली नाही. गैरव्यवहारात अडकलेल्या अधिकाऱ्याला पदोन्नती दिली जात नाही.
मात्र पाटील यांना सहसंचालकपदावरून संचालक केलेच; त्याशिवाय त्यांना जबरदस्तीने महत्वाचे खातेदेखील दिले गेले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी न्यायालयीन किंवा विधिमंडळात मुद्दा उपस्थित झाल्यास राज्य शासन तोंडावर आपटेल, अशा शब्दांत एका सनदी अधिकाऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त केली.
झेंडेंना कृषी परिषदेत पाठविण्यास विरोध
आस्थापना विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की झेंडे यांना कृषी परिषदेत पाठविण्यास नागरी सेवा मंडळाने स्वतःहून विरोध केला. ‘कृषी परिषदेतील सल्लागार पद प्रतिनियुक्तीचे आहे.
ते रिक्त असून ते तातडीने भरण्यासारखी प्रशासकीय स्थिती नाही. त्यामुळे झेंडे यांना गुणनियंत्रण विभागातून काढायचे असल्यास किमान विस्तार विभागाचे संचालकपद द्यायला हवे,’ अशी ठाम भूमिका नागरी सेवा मंडळाने घेतली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.