
Agriculture Export News पुणे ः कृषी व प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) (अपेडा) बहुचर्चित ई-फायटो प्रणाली (E-Phyto System) देशभर लागू केली आहे. यामुळे शेतीमाल निर्यात (Agriculture Export) सेवा जलद व पारदर्शक होतील, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
फरिदाबाद येथील ‘वनस्पती संरक्षण, विलगीकरण व साठवणूक संचालनालया’ने या प्रणालीला मान्यता दिली आहे. त्यानंतर प्रणालीबाबत ‘अपेडा’चे महाव्यवस्थापक यू. के. वत्स यांनी एक सल्ला सूचना जारी केली आहे.
त्यात ‘फायटो प्रमाणपत्र वितरण यंत्रणांनी एक मार्च २०२३ पासून ई-फायटो प्रणालीत कामे करावीत,’ असे सूचित केले आहे.
‘राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटने’च्या (एनपीपीओ) तज्ज्ञांकडून गेल्या काही महिन्यांपासून या प्रणालीवर काम सुरू होते. ‘ई-फायटो’मुळे निर्यात सेवा जलद होण्यास मदत मिळणार असल्यामुळे निर्यातदारांचेदेखील लक्ष या प्रणालीच्या अंमलबजावणीकडे लागून होते.
शेतीमालाची आयात निर्यात सुरक्षित होण्यासाठी आंतरराष्ट्रीय वनस्पती संरक्षण परिषदेने (आयपीपीसी) नियमावली तयार केली आहे. त्यात ‘ई-फायटो’चादेखील समावेश आहे.
‘आयपीपीसी’ने तयार केलेली ही प्रणाली आता केंद्र शासनाच्या ‘वनस्पती विलगीकरण व्यवस्थापन प्रणाली’शी (पीक्यूएमएस) जोडण्यात आली आहे. हे काम ‘एनपीपीओ’ने केले आहे. त्याची चाचणी यशस्वी होताच ही सुविधा देशभर कार्यान्वित केली गेली आहे.
त्यामुळे शेतीमाल निर्यातीसाठी अत्यावश्यक असलेले कायदेशीर ‘वनस्पतीचे आरोग्यविषयक प्रमाणपत्र’ अर्थातच फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट (पीएससी) आता ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपात वितरित होत आहे.
...असे असेल ‘ई फायटो सर्टिफिकेट’
- इलेक्ट्रॉनिक्स फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट तयार करताना ‘आयपीपीसी’ने निश्चित केलेल्या मसुद्याचा वापर
- आधीच्या फायटो प्रमाणपत्रावरील सर्व मजकूर नव्या ‘ई-फायटो’मध्ये जसाच्या तसा असेल. हा मजकूर ‘एक्सएमएल फॉरमॅट’मध्ये असतो
- जागतिक स्तरावर संबंधित देशांच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटनांना त्यांच्या सर्व्हरद्वारे ई-फायटो वितरित करण्यास मान्यता
- ‘ई-फायटो’ तयार होतानाच त्यात जलद प्रतिसाद संकेतांक अर्थात क्यूआर कोडदेखील तयार होतो. त्यामुळे प्रमाणपत्र वाचन झाले सोपे
‘फायटो’ प्रमाणपत्राला का महत्त्व?
केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत वनस्पती संरक्षण, विलगीकरण व साठवणूक संचालनालयाकडून चार सिंहांचे राष्ट्रीय चिन्ह असलेले ‘फायटो’ प्रमाणपत्र दिले जाते.
त्यात निर्यातदाराचे नाव व माल पाठविणाऱ्या संस्थेचा पत्ता, शेतीमालाचे नाव व वनस्पतीशास्त्रीय नाव, वजन तसेच कीड नियंत्रण- निर्मूलन प्रक्रियेसाठी वापरलेले रसायन, परिमाण याची माहिती असते.
संचालनालयाची कार्यालये देशभर नसल्यामुळे राज्यांच्या कृषी विभागांमधील निवडक अधिकाऱ्यांना हे प्रमाणपत्र देण्यासाठी अधिसूचित केले जाते. जागतिक स्तरावर या प्रमाणपत्राशिवाय शेतीमालाची आयात निर्यात करता येत नाही.
नव्या ‘ई-फायटो’ प्रणालीमुळे शेतीमालाच्या आयात-निर्यातीमधील सर्व घटकांची सोय होईल. यातील सेवांचा प्रवास जलद व पारदर्शक होईल. क्यूआर कोडचा वापर हा या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी विभाग.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.