
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे (Melghat Tiger Project) करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात पक्षांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली. त्यात मेळघाटात आढळणाऱ्या पक्षांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली.
महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सर्वेक्षण मोहिमेत सहभागी झाले होते.
अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथे सर्वेक्षणाचा प्रारंभ झाला. तिथून सर्व सहभागींपैकी प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागांत विविध ठिकाणी रवाना झाली.
सर्वेक्षणाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात पक्षी अभ्यास व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व माहितीची ई-बर्ड या संकेतस्थळावर तसेच प्रपत्रांमधे लिखित स्वरूपात नोंद करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले आहेत. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती कळण्यास मदत होणार आहे.
सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्षी प्रथमत:च नोंदविण्यात आले. या नवीन नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचली आहे.
मेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमधे हिमालयन रुबीथ्रोट, गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा
राखी खाटीक व काळ्या पंखाचा कोकीळ खाटीक हे काही दुर्मिळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक या सारखे स्थलांतरित पाणपक्षी नोंदविण्यात आले आहेत.
मेळघाटचे वैभव असलेला रानपिंगळा अनेक पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण ठरला. हा पक्षी सर्वेक्षणात अनेक ठिकाणी आढळून आला.
तो अनेकांना प्रथमच बघायला मिळाला. मेळघाटात प्रथमच आढळून आलेले पक्षी हे मेळघाटातील पुनर्वसन झालेल्या गावठाण क्षेत्रातील विकसित झालेल्या गवताळ अधिवासात आढळून आले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.