पूरपरिस्थिती समोर; ‘जलसंपदा’चे अधिकारी परदेश दौऱ्यावर

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पुराचा धोका नाकारता येत नाही.
Flood
FloodAgrowon

नाशिक : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी (Heavy Rain In Dam Catchment Area) होत असल्याने धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पुराचा धोका नाकारता येत नाही. मात्र अशा परिस्थितीत नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव या परदेश दौऱ्यावर आहेत. एकीकडे जलसंपदा विभागाने (Department Of Water Resources) ६ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे मागील काही वर्षांतील पुराची परिस्थिती पाहता सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडू नये, अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. मात्र असे असताना अहिरराव या दौऱ्यावर असल्याने शासनाच्या निर्णयास केराची टोपली दाखविल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.

Flood
Crop Damage : पावसामुळे खरीप पिकांना बाधा

नाशिक विभागात धरणांच्या परिसरात होत असलेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्या सर्व रजा व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र जबाबदार अधिकारी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ‘कर्मचाऱ्यांना एक न्याय व अधिकाऱ्यांना एक’ असा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (ता.१६) अखेर जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ धरणांत ९८ टक्के पाणीसाठा आहे. त्यापैकी १४ धरणे १०० टक्के तुडुंब भरली आहेत. त्यापैकी २२ धरणातून संभाव्य धोका टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुरपरिस्थितीचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे परदेश दौरा महत्त्वाचा की आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य, असा सवाल उपस्थित होत आहे.

शासन निर्णयानुसार काही अपरिहार्य कारण असल्यास मुख्यालय सोडावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासह परदेश दौऱ्यावर जाताना जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशा सूचना आहेत. मात्र तसे झाले आहे की नाही हा प्रश्न आहे. प्रभारी कार्यभार पालखेड धरण समूहाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्याकडे असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. मात्र लोकप्रतिनधींकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

हा दौरा दोन वर्षांपूर्वी नियोजित होता. मी गेल्या तीन वर्षांपासून इस्राईल विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या काही मित्रांच्या समूहासह सिंह व बिबट्यांचा अभ्यास करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन दौऱ्यावर आहे. मी नाशिक सोडले तेंव्हा पाऊस नव्हता. तशी शक्यता असती तर मुख्यालय सोडले नसते.
अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक.
रजेची मागणी केल्यानुसार रजा मंजूर केली आहे. त्यानुसार अतिरिक्त कार्यभार कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्याकडे देण्यात आला आहे. -
डॉ. संजय बेलसरे, मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com