
जळगाव ः खानदेशात अनेक सिंचन प्रकल्प (Irrigation Project In Khandesh) कोरडे किंवा अद्याप पूर्ण भरलेले नाहीत. त्यातील जलसाठा (Water Storage) किंचित वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात पश्चिम भागात चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, भडगाव भागांतील मध्यम व लघू प्रकल्पांत हवा तेवढा जलसाठा नाही.
गेल्या आठवड्यात सलग चार-पाच दिवस पावसाची संततधार सुरू राहिली. त्यानंतरही अधून मधून कमी जास्त प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. पाऊस समाधानकारक असला तरी तालुक्यातील लहान मोठे सिंचन प्रकल्प मात्र अद्यापही तहानलेलेच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रब्बीसह पाणीटंचाईची भीती आतापासूनच व्यक्त होत आहे.
तालुक्यात यंदा रोहिण्या बरसल्या नाहीत. मृग नक्षत्राच्या पावसाने देखील दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबल्या. मे लागवडीची कापूस पिके जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगल्या स्थितीत होती. परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची चार-पाच दिवस संततधार राहिल्याने मे लागवडीच्या कपाशीसह इतर कोवळ्या पिकांनाही मोठा फटका बसला. पावसामुळे झोपड्यांसह पत्र्याची व मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. पिकांचे नुकसान झाल्याने काहींनी नव्याने बियाण्यांची टोचणी केली. जमिनीत मुरणारा पाऊस असल्याने अनेक शेतांमधून पाणीच निघाले नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पात जलसाठा झाला नसल्याचे चित्र आहे.
पाचोरा तालुक्यात हिवरा व बहुळा, भोकरबारी, चाळीसगावमधील मन्याड, एरंडोलातील अंजनी, पारोळ्यातील बोरी, जामनेरातील तोंडापूर, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ या मध्यम प्रकल्पांत किरकोळ जलसाठा वाढला. तसेच पाझर तलावांच्या जलसाठ्यात वाढ झालेली नाही. अग्नावती धरणात देखील समाधानकारक जलसाठा नाही.
धुळ्यातील सोनवद, शिरपुरातील अनेर या प्रकल्पातही जलसाठा काहीसा वाढला आहे. जळगाव पाचोऱ्यातील सातगाव डोंगरी, सार्वे पिंप्री, पिंपळगाव हरेश्वर, घोडसगाव, अटलगव्हाण, डांभुर्णी, दीघी, पिंप्री, कोल्हे, बांबरुड, लोहटार, मोहाडी, गाळण, म्हसास, कळमसरा, बदरखे, डोंगरगाव, वाडी येथील पाझर तलावातील जल पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. बहुतांश पाझर तलावांमध्ये केवळ मृतसाठा आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठा वाढावा, अशी अपेक्षा वाढली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.