APMC Election Update : दुसऱ्या टप्प्यातही ‘महाविकास आघाडी’ची सरशी

बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ समित्यांच्‍या निकालांमध्येही ‘महाविकास आघाडी’चीच सरशी दिसून आली.
Nagar APMC Election
Nagar APMC ElectionAgrowon

Pune Bajar Samiti Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या (APMC Election) दुसऱ्या टप्प्यातील ८८ समित्यांच्‍या निकालांमध्येही ‘महाविकास आघाडी’चीच (Mahavikas Aghadi) सरशी दिसून आली. या टप्प्यातही मतदारांनी अनेक दिग्गजांना धक्का दिला.

यात मंत्री दादा भुसे, संजय राठोड, भाजपचे नेते मधुकर पिचड, आमदार संतोष बांगर यांचा समावेश आहे. मंत्री संदीपान भुमरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बच्चू कडू यांनी आपली सत्ता कायम राखली आहे, तर पाटण बाजार समितीची सत्ता मंत्री शंभूराज देसाई यांनी खेचून आणली.

दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांत किल्लेदारांनी गड राखले. महाविकास आघाडीला ७, भाजप व शिवसेना युतीला ३, तर अपक्षांना ४ बाजार समित्या मिळाल्या.

दुसऱ्या टप्प्यातील निकालात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकत बाजार समित्यांवर वर्चस्व सिद्ध केले. अकोले, पाथर्डी व श्रीगोंदे येथे सत्तांतर झाले. अकोल्यात माजी मंत्री पिचडांना धक्का बसला. कोपरगावात काळे, कोल्हे आणि परजणेंच्या युतीला यश मिळाले.

Nagar APMC Election
Nanded APMC Election : नांदेड जिल्ह्यात ‘महाविकास’चा वरचष्मा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील चारही बाजार समित्यांवर भाजप-सेना युतीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा पैठण बाजार समितीमधील सत्ता अबाधित ठेवली आहे. फुलंब्री बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या गत १५ वर्षांच्या सत्तेला सुरंग लावत भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे.

गंगापूर बाजार समितीत भाजप-शिवसेना शिंदे गटाने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळविले. लासुर स्टेशन समितीवर भाजपचे आमदार प्रशांत बंब व शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्या पॅनेलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवला.

सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीत स्थानिक आघाड्यांना यश आले. पाटण बाजार समितीत पालकमंत्री शंभुराज देसाई, तर कऱ्हाड बाजार समितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्यसिंहपाटील यांनी विजय खेचून आणला.

सातारा बाजार समितीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निर्विवाद यश मिळवले असून, आमदार मकरंद पाटील यांनी वाई, लोणंद येथे एकहाती मिळवली आहे.

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) बाजार समितीत सर्वपक्षीय सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सर्व १८ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला.

वाशीम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. रिसोडमध्येच केवळ भाजप व सहकारी पक्षाच्या सहकार विकास आघाडीला विजय मिळवता आला. सहकार क्षेत्रावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. कारंजा लाड बाजार समितीवर (कै.) माजी आमदार प्रकाश डहाकेप्रणीत शेतकरी विकास आघाडीचा झेंडा फडकला. संचालक पदाच्या १८ जागांवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले.

Nagar APMC Election
Nagpur APMC Election : निकालांनंतर प्रस्थापितांवर आत्मचिंतनाची वेळ

रिसोड बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या सहकार विकास आघाडीने १० जागांवर विजय मिळवत माजी खा. अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाने आपले स्थान बळकट असल्याचे दाखवून दिले.

महाविकास आघाडीला येथे आठ जागांवर समाधान मानावे लागले. तर मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा सत्ता मिळवली. १८ पैकी विकास आघाडीचे १७ संचालक निवडून आले आहेत. भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला.

यवतमाळ जिल्ह्यातील चार बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा रोवला. झरी बाजार समितीत महाविकास आघाडीने १८ पैकी १८ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. कळंबमध्ये काँग्रेसने सर्व १८ जागा जिंकत भाजपला धोबीपछाड दिला. राळेगावमध्ये काँग्रेसने वर्चस्व राखले असून सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसने

सर्वाधिक १४ जागा जिंकल्या तर भाजपला तीन तर उद्धव ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. घाटंजी बाजार समितीमध्ये येथे पारवेकर गटाने विजयाचा झेंडा फडकविला आहे.

दारव्हा बाजार समितीत शिंदे गटाने १८ पैकी १६, तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. बोरी अरब मध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी युती प्रभावी ठरली. येथे शिंदे गटाला दहा जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध आले होते.

आर्णी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) अशी युती आकाराला आली होती. या युतीने बाजार समितीवर आपले वर्चस्व राखले. अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना त्यांच्या दिग्रस मतदार संघातील बाजार समितीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तर गोरेगावमध्ये भाजपप्रणीत पॅनेलने आपली सत्ता राखली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे पॅनेल विजयी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी मध्ये भाजप, पोंभुर्णात काँग्रेस तर भद्रावतीत शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली. गोंडपिंपरी येथे काँग्रेसची, तर पोंभुर्णामध्ये भाजपची सत्ता होती. या वेळी मतदारांनी दोन्ही सत्ता उलथवून लावल्या. गोंडपिंपरी बाजार समितीच्या स्थापनेपासून काँग्रेस सत्तेत होती.

मात्र या वेळी पहिल्यांदाच भाजपने या बाजार समितीवर विजय मिळवला. पोंभुर्णामध्ये भाजपकडे सत्ता होती. या वेळी काँग्रेसने या बाजार समितीवर झेंडा फडकविला.

भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. १८ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसने तर सात जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले.

नागपूर जिल्ह्यातील मौदा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या समर्थित गटाने राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या युतीला मतदारांनी नाकारले.

काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर व उद्धव ठाकरे गटाचे देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने १६ जागा जिंकत सत्ता काबीज केली.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे बबलू देशमुख यांच्या पॕनेलने गड राखला. चांदूर बाजारमध्ये बच्चू कडू यांची जादू चालली. वरुडमध्ये खासदार अनिल बोंडे, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे. दर्यापुरात आमदार बळवंत वानखेडे व सहकारी.

धारणीत आमदार राजकुमार पटेल व मित्रपक्ष, धामणगाव बाजार समितीमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने दबदबा कायम राखला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com