
माणगाव ः माणगाव हा डोंगराळ व दुर्गम तालुका आहे. डोलवहाळ बंधारा उभारणीपूर्वी तालुक्यातील सुमारे दीडशे ते दोनशे गावांतील नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात पाण्यासाठी (Water) मैलोन् मैलाची पायपीट करावी लागत होती.
तर खरीप हंगामानंतर (kharif Season) शेतकऱ्यांना अन्य रोजगाराचे (Employment) साधने नसल्यामुळे कुटुंबातील तरुण-तरुणी मुंबईत स्थलांतरित होऊन नोकरी करायचे, मात्र डोलवहाळ बंधाऱ्यामुळे शेकडो गावांच्या पाणी पुरवठा योजनांना (Water Supply Scheme) संजीवनी मिळाली आहे.
अनेक गावे टँकर (Tanker Free Village) मुक्त झाली आहेत. तसेच वर्षांतून एकच पीक घेणारे शेतकरी दुबार पीक घेऊ लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. दुबार शेतीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडली आहे.
सह्याद्रीच्या कडे-कपारीत वसवलेल्या माणगाव तालुक्यात प्रामुख्याने कुणबी समाजाचे लोक पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या शेती करतात.
याठिकाणी सुमारे ३०० ते ४०० सेंटीमीटर एवढे वार्षिक पर्जन्यमान असतानाही केवळ भाताचे एकच पीक पूर्वी घेतले जायचे.
साहजिकच शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना आर्थिक ओढाताण व्हायची. त्यामुळे भातपीक आल्यावर अनेकजण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थलांतरित व्हायचे.
पावसाळा संपल्यानंतर जेमतेम महिनाभर नदीतील पाण्याचे स्रोत सुरू राहायचे, त्यानंतर नागरिकांची व जनावरांची पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची, तो पुढील पावसाळा येईपर्यंत.
रोहा तालुक्यातील डोलवहाळ येथे काळ प्रकल्प उभारल्यामुळे शेतकऱ्यांची भटकंती थांबली आहे. शिवाय दुबार पीक घेता येत असल्याने आर्थिक उत्पन्नही वाढले आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ विक्षेपण बंधारा बांधून भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या अतिरिक्त जलावर काळ प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
१९७६ पासून प्रत्यक्ष सिंचनास सुरुवात झाली. काळ प्रकल्पांतर्गत माणगावमधील ७६ व रोह्यातील ४८ गावांना उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.