
जळगाव : गतवर्षी अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने गेल्या उन्हाळ्यात (मार्च ते जून) फारशी पाणीटंचाई (Water Shortage) भासली नाही. दोन वर्षांच्या तुलनेत टँकरच्या (Water Tanker) संख्येतही घट झाली होती. जुलैत पंधरवड्यात झालेल्या दमदार पावसाने भूजल पातळीत (Ground Water Level) वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.५० मीटरने वाढली आहे. सर्वाधिक तीन मीटरची वाढ रावेर तालुक्यात झाली आहे. नुकत्याच झालेल्या भूजल सर्व्हेक्षणातून (Water Level Survey) ही बाब समोर आली आहे.
जून महिन्यात अत्यल्प पाऊस पडला. जूनच्या अखेरपर्यंत पेरण्याच झाल्या नव्हत्या. ज्यांनी पहिल्या पावसात पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. मात्र जुलैत चांगला पाऊस बरसला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे मोठ्या सिंचन प्रकल्पातून धरणाच्या दरवाजाद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्याची वेळ आली होती. पावसाने अजून दमदार हजेरी लावल्यास आगामी भूजल सर्व्हेक्षणात आणि भूजल पातळीत वाढ दिसेल, असा असा अंदाज भूवैज्ञानिकांनी वर्तविला आहे.
गतवर्षीचा विचार करता पावसाळ्यात इतर तालुक्यात अधिक पाऊस झाला असताना चोपडा तालुक्यात कमी पाऊस झाला होता. भूजल सर्व्हेक्षणात चोपडा तालुक्यातील पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र चोपडा तालुक्यात ०.८२ मीटरने वाढ झाली आहे. सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुका-- झालेली वाढ (मीटर)
जळगाव--१.७१
मुक्ताईनगर--२.३६
भुसावळ २.००
चाळीसगाव--१.८४
रावेर--३.०२
बोदवड-- २.५८
भडगाव-- १.५८
धरणगाव-- १.३०
अमळनेर--१.२५
जामनेर--१.०१
पारोळा--०.९६
चोपडा-- ०.८२
पाचोरा--०.७९
एरंडोल--०.६८
यावल--०.५०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.