
नागपूर ः देश तेलबियावर्गीय पिकाच्या (Oil Seed Crop) उत्पादकतेत स्वयंपूर्ण व्हावा याकरिता केंद्र सरकारकडून प्रयत्न होत आहेत.
त्या प्रयत्नांना साथ देत केंद्रीय सोयाबीन (Soybean) संस्था येत्या काळात उत्पादनक्षम वाण व त्याच्या जोडीला प्रगत तंत्रज्ञान या माध्यमातून सोयाबीनमध्ये (Soybean Productivity) अपेक्षीत उत्पादकतेचा टप्पा गाठण्यात यशस्वी होईल, असा विश्वास इंदूर (मध्य प्रदेश) येथील केंद्रीय सोयाबीन संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंह यांनी व्यक्त केला.
हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय खाद्य तेल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. सिंह म्हणाले, की खाद्यतेलाची आयात करावी लागत असल्याने देशाला यासाठी मोठे परकीय चलन मोजावे लागते. परिणामी ही बाब गांभीर्याने घेत केंद्र शासनाकडून खाद्यतेलाची उत्पादकता वाढावी यासाठी प्रयत्न होत आहेत.
देशात गेल्या काही वर्षात सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ नोंदविली गेली आहे. अपारंपरिक राज्यांमध्ये देखील शेतकरी सोयाबीन लागवडीसाठी सरसावले आहेत.
या शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासोबतच उत्पादनक्षम वाण विकसित करण्यावरही संस्थेचा भर राहिला आहे. देशातील काही प्रादेशिक संशोधन केंद्रांनी देखील सोयाबीन वाण संशोधनात आघाडी घेतली आहे.
या साऱ्या प्रयत्नातून निश्चितच देश तेलबियावर्गीय पिकाच्या उत्पादकतेत आघाडी घेत खाद्यतेलात स्वयंपूर्ण होईल.
यावेळी मध्यप्रदेशातील बडौदा येथील शेतकरी मेहरबान सिंह तसेच पानोड येथील विजयेंद्र सिंह चौहान यांना सोयाबीनच्या अधिक उत्पादकतेसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. यू. दुपारे तसेच मृणाल कुचलान यांच्या मार्गदर्शनामुळे अधिक उत्पादकतेचा पल्ला गाठता आला, अशी भावना या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.