Sugar Industry : साखर कारखानदारी आता चौथ्या पिढीच्या ताब्यात
Sakal Cooperation conclave पुणे: साखर उद्योगाला (Sugar Industry) भविष्यात चांगले दिवस येणार आहेत, हा उद्योग वाढण्यास मोठी संधी आहे. पण त्यासाठी केवळ साखर उत्पादनापुरते (Sugar Production) मर्यादित न राहता, उपपदार्थनिर्मितीवर भर द्यायला हवा.
उत्पादन खर्च कमी करताना, तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक वाढविण्याची गरज आहे, असा सूर सकाळ माध्यम समूह आयोजित सहकार महापरिषदेतील (Sakal Co-0peration Conclave) परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
‘सहकारी साखर क्षेत्रात नव्या पिढीसाठी दिशा’ या विषयावर परिसंवाद झाला. साखर आयुक्त शेखर गायकवाड, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्या सौ. अंकिता पाटील-ठाकरे, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, सदगुरू श्री श्री साखर कारखान्याचे रोहन नारा, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यामध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
श्री. नाईकनवरे म्हणाले, की कोरोनाचा फटका साखर उद्योगालाही बसला आहे. पण आता हा उद्योग सावरतो आहे, हा उद्योग वाढण्यासाठी भविष्यात मोठी संधी आहे. तरुण उद्योजक यामध्ये आले आहेत. त्यांच्या कल्पना, त्यांचे धोरण वेगळे आहे, त्यांच्या याच सहभागाचा, तंत्रज्ञानाचा फायदा हा उद्योग वाढण्यासाठी होणार आहे.
साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, की साखर कारखानदारीत आता चौथी पिढी आली आहे. पूर्वीच्या पिढीने या उद्योगासाठी समर्पण, त्याग भावनेने काम केले. आताचे प्रश्न वेगळे आहेत, त्यातील अडचणी वेगळ्या आहेत.
पण नवी पिढी त्यातून मार्गक्रमण करताना नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची, ती वाढवण्याची दृष्टी ठेवून आहे. पुढची २५ ते ५० वर्षे साखर उद्योगाला मोठे भविष्य आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. आज जवळपास २० हजार कोटीची गुंतवणूक डिस्टलरी आणि विस्तारीकरणामध्ये येते आहे.
देशाचा साखर उद्योगाचा एकूण एक लाख कोटीचा टर्नओव्हर होता, पण आता तो एकट्या महाराष्ट्राचा झाला आहे. त्यात ४५ हजार कोटी एफआरपी आहे. हा आकडा नक्कीच या उद्योगातील भविष्य सांगून जातो. शिस्त आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास ब्राझीलप्रमाणे महाराष्ट्र ही या क्षेत्रात मोठी प्रगती करेल.
श्री. कोल्हे म्हणाले, की सहकाराने सुवर्णकाळ बघितला, माझी तिसरी पिढी आहे. वस्त्रोद्योगानंतर मोठा उद्योग हा साखर उद्योग आहे. साखर उद्योग हा तीन चाकावर चालणारी गाडी आहे.
व्यवस्थापन, शेतकरी आणि सरकार अशी ही गाडी आहे. या तिन्ही स्तरावर उत्तम समन्वय राहायला हवा. मुळात साखर उत्पादन हा मुख्य उद्योग न राहता, उपपदार्थनिर्मितीवर भर द्यायला हवा. तसेच तो वर्षभर चालायला हवा.
सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा. आम्ही आमच्या कारखान्यात तो प्रयोग सुरु केला आहे. उसाचे लागवड क्षेत्र, हार्वेस्टिंग किती होणार, रिकव्हरी किती मिळेल, याचा अंदाज आम्हाला त्या माध्यमातून मिळतो. यासारखे विविध तंत्रज्ञान वापरणे आता गरजेचे आहे.
सौ. पाटील-ठाकरे म्हणाल्या, की सहकार चळवळ ही महाराष्ट्राची ओळख आहे. देशाच्या विकासात या चळवळीचे मोठे योगदान आहे.
केंद्र सरकारने सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार केले आहे. इथेनॅाल, एमएसपी यासारख्या विषयावर या मंत्रालयाने अलीकडच्या काही महिन्यात चांगले निर्णय घेतले.
या उद्योगातील आमची पिढी आणि या आधीच्या पिढीच्या कामामध्ये अंतर आहे. पण आमची पिढी हे अंतर आपल्या कामातून पुसून टाकत आहे. साखर उद्योगात विविध तंत्रज्ञानाचा वापर वाढीसाठी पोषक आहे.
श्री. पवार म्हणाले, की साखर उद्योगातील संधीही वाढत आहेत. यामध्ये लिंक मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे. खासगी क्षेत्रात त्याचे चांगले परिणाम आहेत, ते सहकारातही शक्य आहे का, हे तपासण्याची गरज आहे. कमीत-कमी मनुष्यबळामध्ये काम व्हायला पाहिजे. उत्पादन आणि उतारा वाढवला पाहिजे.
श्री. नारा म्हणाले, की साखर उद्योगाचे योग्य व्यवस्थापन झाल्यास यातील एक लाख कोटींची उलाढाल सव्वा लाख कोटींवर जाईल. व्यवस्थापन महत्त्वाचा भाग आहे. त्यावर लक्ष द्यायला हवे. सर्व कारखान्यांनी खरेदी आणि तंत्रज्ञानाचा वापर सामूहिकरीत्या केल्यास खर्च वाचेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.