
सोलापूर ः उजनी धरणाकडे (Ujani Dam) वरच्या धरणाकडून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात (Water Discharge in Ujani Dam) आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी (Water Level In Dam) झपाट्याने वाढत चालली आहे. कालच ५० टक्क्यांचा टप्पा पार करणाऱ्या धरणाची पाणीपातळी बुधवारी (ता. २०) दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार ५३.१२ टक्क्यांवर पोहोचली. एकाच दिवसात जवळपास तीन टक्क्यांनी पाणीपातळी वधारली.
धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात अधून-मधून पाऊस होतो आहे. शिवाय या पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे बऱ्यापैकी भरल्याने अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडले जात आहे. उजनी धरणाकडे गेल्या आठवड्यात सर्वाधिक ५० हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते. पण पाऊस थांबल्यानंतर हा विसर्ग कमी करण्यात आला.
अगदी काल मंगळवारपर्यंत (ता. १९) दौंडकडून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग २० हजार ९६० क्युसेकपर्यंत अखंडपणे सुरू होता. पण काल दुपारपासून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. रात्री हा विसर्ग २६ हजार ९९५ क्युसेक, तर बुधवारी सकाळी तो २७ हजार १७१ क्युसेक करण्यात आला. पाण्याच्या या विसर्गवाढीमुळे धरणाच्या पाणी पातळीत मात्र झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणाने आधीच अर्धशतकी पातळी १२ दिवस आधीच पूर्ण केली आहे. आता लवकरच शंभरीकडे धरण पोचण्याची शक्यता आहे.
पाणी पातळी ५३.१२ टक्क्यांवर
बुधवारी (ता. २०) सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार धरणातील एकूण पाणीपातळी ४९४.४९० मीटरपर्यंत पोहोचली. तर एकूण पाणीसाठा ९२.१३ टीएमसी राहिला. तर उपयुक्त साठा २८.४६ टीएमसी एवढा होता. तर या पाण्याची टक्केवारी ५३.१२ टक्के इतकी राहिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.