
Aurangabad : कोकण वगळता राज्यात विस्तारलेल्या अनेक बागांमधील केसर आंबा (Kesar Mango) यंदा लवकर येण्याची आशा आहे. वेळीच केलेला कल्टारचा वापर, त्यामुळे लवकर आलेला मोहर आणि त्यामुळे आंबा (Mango Season) लवकर येण्याचे गणित जुळून आल्याचे तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हापूस (Hapus), गुजरात केसरला चुकवून येणारा केसर भाव खाऊन जाईल, अशी आशा केसर आंबा उत्पादकांना आहे.
‘‘मराठवाड्यासह राज्यातील केसर आंबा बागा साधारणतः: डिसेंबर, जानेवारीमध्ये मोहरतात. काही प्रतिकूलता आली तर मोहर लागणे फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबते. त्यामुळे १५ ते २० मे नंतरच केसर आंबा बाजारात येणे सुरू होतो. नेमका त्याच वेळी गुजरातचा केसरही मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे राज्यातील केसर आंब्याला त्याच्याशी स्पर्धा करावी लागते.
यंदा मात्र महाकेसर आंबा बागायतदार संघाद्वारे एकत्र आलेल्या राज्यातील आंबा उत्पादकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने अनेक केसर आंबा बागा पाऊस लांबला तरी नेहमीच्या वेळेपूर्वी महिनाभर आधी म्हणजे नोव्हेंबरमध्येच मोहरणे सुरू झाल्या. अशा बागांमध्ये आजघडीला जवळपास ६० ते ८० टक्क्यांपर्यंत मोहर फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मोहरच नाही तर काही बागांमध्ये फळधारणाही सुरू झाली असल्याची माहिती ‘महाकेसर’चे तज्ज्ञ संचालक डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.
मोहोर लवकर सुरू झाल्यामुळे मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्येच आंबा काढणे सुरू होईल, असा अंदाजही तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यंदा हवामानातील चढ-उतारामुळे तसेच दीर्घकाळ म्हणजे ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाळ्यामुळे ऑक्टोबर हीट न मिळाल्यामुळे नवीन नवती येऊन मोहर येण्यास उशीर होतो की काय, असा प्रश्न होता. ‘‘यावर्षी कोकणात सुद्धा हापूसची परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. त्यांचाही हंगाम सगळीकडे सध्या पालवी असल्यामुळे उशिरा राहील, असा अंदाज आहे. आपला केसर पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण मोहरून जाईल, अशी शक्यता वाटते,’’ असे डॉ. कापसे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.