
पुणे : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मराठवाड्यातील विधानसभा मतदार संघात होणाऱ्या सिल्लोड महोत्सवासाठी (Sillod Festival) कृषी खात्याच्या (Agriculture Department) अधिकाऱ्यांना पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्याने कृषी आयुक्तालयात (Agriculture Commissionerate) खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या वर्गणीसाठी चार प्रकारची पावती पुस्तके छापून सर्व जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आली आहे.
“युती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी खात्याचा असाच एक ‘वर्गणी महोत्सव’ भरवला होता. त्यांच्या मतदार संघात कृषी प्रदर्शन आयोजित केले होते. तेव्हा एकट्या सांगली जिल्ह्यातून ३५ लाख रुपये गोळा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.
मात्र खोत यांनी पावती पुस्तक छापण्याचे धाडस केले नव्हते. विद्यमान कृषिमंत्र्यांनी ते धाडस केले आहे. राज्यातून किमान साडेपाच कोटी रुपये गोळा होतील, अशा बेताने पावती पुस्तके छापण्यात आलेली आहेत,” अशी माहिती कृषी खात्याच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
एक ते दहा जानेवारी दरम्यान औरंगाबादच्या सिल्लोड येथे होत असलेला ‘सिल्लोड महोत्सव’ कृषी खात्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. “कृषी मंत्रालयाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी कृषी प्रदर्शनासाठी पावती पुस्तके खपविण्याचे काम कृषी आयुक्तालयाच्या गळ्यात मारले आहे. सहसंचालक दर्जाचा एक अधिकारी या पावती पुस्तकांबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
या पावत्यांवर सिल्लोड महोत्सव असा उल्लेख असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह कृषी आयुक्त व औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची छायाचित्रे आहेत. कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा तीन विभागांत या महोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. विशेष म्हणजे महोत्सवाच्या या पावत्यांवर कुठेही मूल्य, तिकीट क्रमांक नमूद करण्यात आलेले नाही. ही तिकिटे किती, कोणी व कुठे छापली आहेत, नेमकी किती रक्कम गोळा होणार व ती कोण जमा करणार, त्याचा हिशेब दिला जाणार नाही की नाही, याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कृषी आयुक्तालयाने या पावत्या राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पाठवल्या आहेत. तेथून या पावत्या प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवल्या गेल्या आहेत. संबंधित तालुक्यांमधील खते, कीडनाशके व बियाणे विक्रेत्यांना या पावत्या द्याव्यात व मोबदल्यात पैसे गोळा करून कार्यालयांमध्ये जमा करण्याच्या तोंडी सूचना दिलेल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, कृषी काही निविष्ठा विक्रेत्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या नावाखालील ही पावती वसुली बेकायदा असल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला आहे. अर्थात, त्यामुळे स्थानिक पातळीवरील गुणनियंत्रण निरीक्षक व विक्रेत्यांमध्ये खटके उडत आहेत.
“कृषी आयुक्तालयातून रोज आमच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. गुणनियंत्रण खात्याकडून निविष्ठा उत्पादन व विक्रीचे परवाने घेतलेल्या उत्पादकांकडून देखील वर्गणी वसूल केली जाणार आहे. यापूर्वी दोन वर्षे ठाण मांडून बसलेला कोरोना, त्यानंतरचा अवकाळी पाऊस व आता कृषिमंत्र्यांचा महोत्सव असे सुलतानी संकट अशा विविध समस्यांना तोंड देत गुणनियंत्रण विभाग काम करतो आहे.
या वर्गणी पद्धतीमुळे कृषी खात्याची नाचक्की होत आहे. आमच्यातील काही अधिकारी या पावत्यांचे मूल्य स्वतः वाढवून अधिकचे पैसेदेखील उकळत आहेत. यात दस्तुरखुद्द कृषी आयुक्तालयावरच वसुलीची जबाबदारी देण्यात आल्यामुळे आता दाद कोणाकडे मागायची,” असा सवाल आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.
विविध पावत्यांचे तोंडी शुल्क
(पावत्यांवर शुल्कचा ल्लेख नाही)
प्लॅटिनम पावती : २५ हजार रुपये
डायमंड पावती : ५ हजार रुपये
गोल्ड पावती : १० हजार रुपये
सिल्व्हर पावती : ५ हजार रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.