‘वनामकृवि’च्या कुलगुरू निवड शोध समितीकडून उमेदवारांना आमंत्रण

१९ आणि २० जूनला औरंगाबाद येथे होणार सादरीकरण
‘वनामकृवि’च्या कुलगुरू निवड शोध समितीकडून उमेदवारांना आमंत्रण
VNM Agricultural University Agrowon

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी स्थापन शोध समितीने पात्र उमेदवारांना विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याअनुषंगाने रविवार (ता. १९) आणि सोमवारी (ता.२०) औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शोध समितीसमोर उमेदवारांना सादरीकरण करावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यपाल तथा कृषी विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी नावे प्रस्तावित करण्यासाठी स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय शोध समितीचे अध्यक्ष एनसीईआरटीचे माजी संचालक पद्मश्री प्रोफेसर जगमोहन सिंग राजपूत हे आहेत. सदस्यांमध्ये पुसा, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय)च संचालक डॉ. ए. के. सिंग, कृषी सचिव एकनाथ डवले यांचा समावेश आहे.

कुलगुरू पदाची पात्रता आणि अनुभव धारण करणारे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ, कुलगुरू जबाबदारीच्या पदावर कार्य करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून शोध समितीने ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागविले होते. देशभरातील विविध संस्थांतील ३० हून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे महाराष्ट्रातील आहेत. त्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील चार उमेदवारांचा समावेश आहे. अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. पात्र उमेदवारांना शोध समितीने विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी तसेच सादरीकरण करण्यासाठी ई-मेलव्दारे आमंत्रित केले आहे. शोध समितीकडून अंतिम पाच उमेदवारांची नावे राज्यपालांकडे मुलाखतीसाठी पाठविण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com