
विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur Cotton Farming News: देशाच्या इतर भागात बिटी कापूस (BT Cotton) बियाण्याची विक्री सुरू असताना महाराष्ट्रात मात्र बोंडअळीची भीती दाखवीत एक जून पर्यंत विक्री बंदीचे आदेश आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील बियाणे विक्रीमुळेच बोंडअळी (Bollworm ) येते का? असा सवाल महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशनने उपस्थित केला आहे.
‘माफदा’चे महासचिव बिपिन कासलीवाल तसेच अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या इतर भागाप्रमाणे महाराष्ट्रात देखील शेतकरी पूर्व हंगामी कापसाची लागवड करतात. मात्र गेल्या काही वर्षांत कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.
त्या पार्श्वभूमीवर बोंडअळीच्या नियंत्रणासाठी या किडीची खाद्य साखळी विस्कळित व्हावी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारने महाराष्ट्रात एक जून पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर प्रतिबंध लादला आहे.
यंदा देखील ही बंदी कायम आहे. महाराष्ट्रात एक जून पर्यंत बीटी कापूस बियाणे विक्रीवर शासकीय प्रतिबंध असताना लगतच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांत मात्र कापूस बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सीमावर्ती भागातील दुकानांमधून याची खरेदी करतात.
शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन त्यांना बियाणे खरेदीचे थातूरमातूर बिल दिले जाते. त्यावर लॉट नंबर व इतर माहिती देखील नोंदवलेली नसते. त्यासोबतच कापूस बियाणे घेताना इतर काही निविष्ठा लिंकिंग स्वरुपात शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात.
नियमानुसार बिलावर खरेदीदार आणि विक्रेता या दोघांची स्वाक्षरी असणे गरजेचे राहते. मात्र या नियमाकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे.
परिणामी बियाण्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दादही मागता येत नाही. सीमावर्ती भागात बियाणे खरेदीसाठी गेल्यानंतर शेतकऱ्यांचा एका पाकिटामागे वाहतूक खर्च जेवण व इतर बाबींवर देखील खर्च होतो. परिणामी त्याच्या उत्पादक खर्चात वाढ होते.
दुसरीकडे शेतकरी हंगामापूर्वीच बियाणे खरेदी करत असल्याने महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रधारकांचे नुकसान होते. त्यांच्याकडील कापूस बियाण्यांना हंगामात मागणी राहत नाही.
या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रात देखील एक जूनपूर्वी बीटी कापूस बियाणे विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ‘माफदा’ने केली आहे.
देशाच्या इतर भागात कापूस बियाण्याची सर्रास विक्री होत असताना केवळ महाराष्ट्रात एक जूनपूर्वी बियाणे विकल्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो हा दावा चुकीचा असल्याचे देखील ‘माफदा’ने म्हटले आहे.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ यांनी महाराष्ट्रात बियाणे विक्रीसाठी एक जूनची डेडलाईन निश्चित केली आहे. त्यापूर्वी बियाणे विक्री आणि लागवड झाल्यास किडीला अंडी घालायला जागा मिळते.
एक जून नंतर पावसाळ्यात फ्लाय येतात. परंतु क्रॉप नसल्याने त्यांची उत्पत्ती कमी होते असा तर्क आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात एक जून पर्यंत विक्रीस प्रतिबंध आहे. शास्त्रीय आधारावरच ही बंदी लादण्यात आली आहे.
- विकास पाटील,
संचालक, निविष्ठा व गुण नियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.