Rural Life : गावगाड्याचा हा भाग आता अस्तंगत होत चालला आहे का ?

अलीकडंच पुन्हा एकदा 'चिमणीपाखरं' नावाचा खूप जुना सिनेमा पाहिला, तो पाहिल्यावर लहानपणी जेव्हा मी तो सिनेमा पाहिला होता तेव्हा कशी मी खूप रडले होते एका प्रसंगाला ते आठवलं.
Rural Life
Rural LifeAgrowon

- अवंती कुलकर्णी

अलीकडंच पुन्हा एकदा 'चिमणीपाखरं' नावाचा खूप जुना सिनेमा पाहिला, तो पाहिल्यावर लहानपणी जेव्हा मी तो सिनेमा पाहिला होता तेव्हा कशी मी खूप रडले होते एका प्रसंगाला ते आठवलं. त्यात त्या चारपाच भावंडांची आई वारते आणि वडलांनाही कुठल्यातरी कारणावरून तुरुंगात जावं लागतं. त्यातल्या त्यात मोठ्या बहिणीवर सर्व कुटुंबाची जबाबदारी येऊन पडते.

भावाला घालायला कपडे नसतात म्हणून ती गुपचूप घरातली भांडी चकचकीत करून दारावर आलेल्या बोहारिणीला देते आणि तिच्या गाठोड्यातून त्याच्यासाठी कपडे घेते...असा हा प्रसंग, बालवयातच का आजही असा प्रसंग पाहिला तर डोळ्यात पाणी येईलच! लहानपणी हा सिनेमा पाहिला त्यानंतर कितीतरी दिवस आमच्याकडं बोहारीणबाई आल्या की त्यांच्या त्या टोपलीत कुणाचं जुनं भांडं आहे का हे शोधत होते.

तर, आमच्याकडं बोहारीण यायची. ती बोहारीण आहे हे सगळ्यांनाच माहिती असायचं तरीही सारेजण त्यांना भवारीणच म्हणायचे. त्यांचं नाव कुणालाच माहिती नव्हतं, त्यामुळं नावानं हाक मारणं तसंही शक्य नव्हतं. त्याही आमची सर्वांची नावं कशाला लक्षात ठेवतील? त्यांना कुठलं घर कुणाचं हे माहिती असायचं पण. म्हणजे 'हा ते देवळाच्या उजवीडचं घर देशपांड्यांचं आनी डावीडचं घर घोरपड्यांचं', 'तित्तून असं गेलं इनी धा पावलं फत्त की मंग जादवांचं घर येत्या',

'आनी मग जरा ते चपलीच्या दुकानाच्या हितलं घराय इनी ते कुलकर्ण्यांचं, तेंच्या दारात बसतोय म जरा, तेन्नी पानी तेन देत्यात'. त्या असं अस्सल कोल्हापुरी बोलायच्या. गल्लीतल्या घरातल्या बायकांना भवारीण बाई मावशी, ताई, आज्जे, वयनी, आक्का असं काही बोलायच्या. आणि असलाच कुणी पुरुषमाणूस तर दादा किंवा भाऊ इतकंच म्हणत. घरचे लोकही तिला बाई किंवा मावशी म्हणून हाक मारत.

गल्लीच्या तोंडापासून "भांडीऽऽऽऽय्यय" असं तारसप्तकात हाकारून त्यांच्या ठरलेल्या घरांच्या दारात उभारून बोहारीणबाई म्हणत "वयनी हाईत का काई कापडं?"  उन्हात रापून काळी तुकतुकीत कांती, त्यावर पाॅलिष्टर किंवा वायलचं फुलांच्या डिझाईनचं लुगडं, तेही काष्टा मारलेलं असा वेष त्यांचा. हातभर बांगड्या अन् बांगड्यांखाली चोळीच्या हातोप्यापर्यंत सगळीकडं काहीबाही गोंदलेलं. कपाळावर पिंजर लावलेलं असायचं. बहुतेक आंबाडा असायचा केसांचा कारण डोईवरून पदर असायचा. पण कान मात्र अगदी भरलेला होता कानातल्यांनी. पायात अभ्यंकर फूटवेअर्सचे मजबूत चप्पल असायचे तेही कधीकधी नसायचे.

गळ्यात ठसठशीत बोरमाळ, जोंधळीपोत असायची. दात मशेरी अन् तंबाकूमुळं अगदी काळे झालेले अन् चेहऱ्यावर सुरकुत्यांचं अगदी जाळं झालेलं.  बोहारीणबाई अगदी काटकुळ्या होत्या मात्र त्यांच्या डोईवर एक मोठं शिफ्तरभरून भांडी असायची अन् काखेला दोन दोन भली थोरली कपड्यांची गाठोडी अडकवलेली असत. बोहारीणबाईंचं येणंही अगदी नेमक्या वेळचं असायचं. दुपारी शक्यतो पुरुषमाणसं घरात नसायची. नोकरदार वर्ग ऑफिसात अन् शेतकरी वर्गही दुपारचं मळ्यातच असायचे.

घरात राज्य बायकांचं त्यावेळी. बायकांची सैपाकपाणी, जेवणं, उष्टशेणं, भांडी धुणी आटोपली की दुपारचा वेळ त्यांचा स्वतःचा असायचा. त्यावेळी "भांडीय्य" ऐकलं बायका लगबगीनं कुठं पोटमाळ्यात, कुठं अडगळीच्या खोलीत, कुठं आणि कुठं ठेवलेली कपड्यांची गाठोडी घ्यायला जाणार आणि भवारीणबाईचं "वयनी हाईत का काई कापडं?" विचारायची वाट बघत बसणार. आमच्याही घरी असंच होतं. भवारीणबाई आली की घरातल्या सगळ्या बायका म्हणजे मावशीआज्जी, काकवा, आत्या आली असेल तर ती, आईला सुट्टी असेल तर तीही अशा सर्वजणी आपापल्या जुन्या कपड्यांची गाठोडी घेऊन तिच्यासमोर येणार. मग पहिल्यांदा भवारीणबाई हातातली गाठोडी खाली ठेवणार आणि म्हणणार "ओ वयनी जरा हात लावता काय बिगीनं?"

मग घरातलं कुणीतरी तिच्या त्या भल्या थोरल्या, भांड्यांनी भरलेल्या शिफ्तराला तिच्या डोक्यावरून उतरवायला मदत करणार. त्या शिफ्तरात कायकाय असे ! चांदीपेक्षाही चमचमणारी हिंडालियम, जरमनची, चकचकीत, गुळगुळीत स्टीलची तर काही ठोके मारलेली अशी अगदी मोहरीच्या चमच्यापासून ते शंभर लोकांचा स्वयंपाक होईल इतपत मोठं पातेलं नाहीतर डेचकं इथपर्यंत हर तऱ्हेची भांडी असायची. लहानवयात, भातुकली खेळायच्या वयात ही भांडी पाहून इतका आनंद व्हायचा की ही सारीच्या सारी भांडी आपल्या खेळात हवीत असं वाटे. स्टिलच्या भांड्यांना त्या ष्टिलीची भांडी म्हणत तर हिंडालियमच्या भांड्यांना हिंडालेमची भांडी म्हणत. किंवा मग आलुमिलीची भांडी असंही म्हणत

Rural Life
Wheat Sowing : शेतकरी गहू पिकास पाणी देण्यात दंग

आमच्याकडं येणाऱ्या बोहारीणबाईंना सारेच भवारीणबाई म्हणत, तर या भवारीणबाई माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडं येत. घरातल्या वडील बायका सांगतात की त्या अगदी तरुण वयाच्या असल्यापासून येत. मी मात्र माझ्या कळत्या वयापासून ते माझं पदव्युत्तर शिक्षण होईपर्यंत त्यांना आमच्याकडं येताना बघत होते. तसाच वेष, तसाच खणखणीत आवाज अन् तशीच शिफ्तर. बदल झाला होता तो फक्त चेहऱ्यात, सुरकुत्यांचं जाळ अधिक गडद झालेलं. आमच्या या भवारीणबाईंची काही घरं ठरलेली होती अगदी. पैकी आमच्या घरी त्या जरा सैलावत. ऐसपैस बसत, खलमालीच बसायच्या जमिनीवर बस्कर अंथरून दिलं को त्यावर बसायच्या. मग कुणीतरी गुळाचा खडा, पाणी देई ते घेऊन त्या व्यवहाराला सुरुवात करण्याअधी सगळ्यांची ख्याली खुशाली विचारत.

मग घरच्या बायकाही तिची, तिच्या कुटुंबाची, लेकीनातवंडांची चौकशी करत. कधीतरी ती कौतुकानं सांगतही "नातीनं बगा साळंत आज कवतिक मिळवलं" असं म्हढून कुठल्यातरी स्पर्धेत किंवा कशाततरी त्यांच्या नातीनं काहीतरी छान कामगिरी  केल्याचं अगदी अभिमानानं सांगत. आणि मग खरा व्यवहार सुरु करत. "वयनी आओ या असल्या सुती साड्यांचं चिरगुटंबी होत नाईत, जरा पालिष्टराचं लुगडं असल तर बगा, नाईतर दादांची शर्टं तेन असत्याल तरी चालंल, न्हाई मग तुमची परकरंबी चालत्यात पन सुती तेवडं चालत नाई ओ" असं म्हणून कितीही कपडे त्या गाठोड्यात असले तरी एखादं लुगडं, एखादा शर्ट वर मागतच असत. मग मावशी किंवा आत्या किंवा आईनं " बाई ती ठोके मारलेली परात द्या इतक्या कपड्यांना",

" नाहीतर असं करा, हे एक पातेलं, हे बारा चमचे, या ताटल्या आणि हा पेढेमाठी डबा द्या" हे असं सुरु असे. म्हणजे घरातल्या बायका काय बोलतात आणि त्यावर भवारीण बाई काय म्हणतेय या संभाषणात आमची मान घड्याळ्याच्या पेंड्युलमसारखी इतकडून तिकडं, तिकडून इकडं सतत होत असायची. यामुळं आम्हाला मात्र अनेक प्रकारची भांडी बघायला मिळत आणि त्याची छानछान नावंही समजायची. म्हणजे पेढेघाटी किंवा पेढेमाठी डबा, डेचकी, तामलं, शकुंतला भांडं, गुंडगं, गंज, काटवट, तेलाचा कावळा, चंबू, ओगराळं, तसराळं, टवळं, अशी अनेक नावं. काही नावांवर आम्ही वयाला साजेसं हसायचोही. तर हा असा घासाघीस प्रकार नेहमीचाच असे. घरच्या बायकाही चतुर अन् भवारीणबाईही चतुरच त्यामुळं दोन्ही बाजू आपापल्या व्यवहारकौशल्यावर खूष होत असत. 

माझा एक लाँग स्कर्ट होता. खूप सुरेख पोताचा  आणि खूप घेराचा होता तो. तो मी फार वापरला होता. म्हणजे माझी उंची वाढल्यावर तो आखूड झाला तरी वापरत असे मी इतका सुरेख होता स्कर्ट. कालांतरानं त्याचं इलास्टिकही सैल पडलं तर मी आईकडून पिना घेऊन त्या लावून तो स्कर्ट वापरत असे इतका मला त्याचा मोह जडला होता. एकेदिवशी आईने तो स्कर्ट भवारीणबाईला द्यायच्या कपड्यात ठेवून दिला. भवारीणबाई महिन्यातल्या एका बुधवारी येत असत आमच्याकडं. नेहमीच्याच दुपारच्यावेळी त्या आल्या. अन् नेमकी आईलाही सुट्टीच होती त्या दिवशी. मीहि शाळेतून लवकरच आले होते. आईनं तो स्कर्ट गाठोड्यातून काढून भवारीणबाईंपुढे धरला मात्र मी वेगानं येऊन तो हिसकावून घेतला.

आईनं खूप समजावलं अन् तो स्कर्ट माझ्याकडून काढून घेतला. भवारीणबाई काहीच बोलल्या नाहीत. त्या दिवशी आईनं एक घराच्या दरवाजाच्या आकाराचा स्टिलचा टिफिन डबा आणि इतर काही हिंडालायमचे डबे घेतले त्यांच्याकडून. मी घुश्शातच होते पुढचे काही दिवस. नंतर काहीच दिवसात एकदा भवारीणबाई त्यांच्याहाताला धरून एका मुलीला घेऊन आल्या. त्या मुलीच्या अंगावर तो स्कर्ट होता. ती त्यांची नात, तिचा वाढदिवस म्हणून तिला तो स्कर्ट डागडुजी करून घालायला दिला होता त्यांनी. माझा स्कर्ट कुठेतरी कारखान्यात जाऊन ग्रीसचे डाग पुसायला वापरत नाहीत हे समजण्यानं माझा घुस्साच निघून गेला आणि तो स्टिलचा टिफिन डबा मी रोज शाळेत नेऊ लागले. आजही तो डबा मी वापरते.

त्या काळी आमच्या घरातील, गल्लीतील अन् बहुतांश मध्यमवर्गीय सर्व स्त्रियांच्या घरातली बहुतेक भांडी ही बोहारीणबाईकडून घेतलेलीच असायची. म्हणजे पिठं साठवणुकीचे मोठे असे हिंडालिचे डबे, तूप काढण्यासाठी म्हणून लहान मोठी तामली, पोहे खाण्याकरताच्या ताटल्या, दूधाची पातेली अन् दुधावर झाकायच्या जाळीच्या ताटल्या, भाकरीसाठी लागणारी परात, तर तेल काढायसाठी लागणारा तेलाचा कावळा, लाडू ठेवढ्यासाठी पेढेमाठी डबा तर दही लावण्यासाठीचं शकुंतला भांडं, ताटं, वाट्या, पेले अशी एक ना अनेक भांडी, अख्खे संसार या बोहारणींकडून घेतलेल्या भांड्यांतच उभे राहिले त्या काळी. त्यांच्याकडच्या भांड्यांचं वैशिष्ट्य हे की ती जड, चांगल्या प्रतिच्या धातूची असत, उभी चीर जाणे अथवा गंजणे असे प्रकार तिथं होत नसत.

Rural Life
Development In Rural Area: सावधान ! ‘विकास’ येतो आहे..

लहानपणी मला प्रश्न पडत असे की का घ्यायची यांच्याकडून भांडी, आपण घेऊ की दुकानातून विकत. आणि हे जुने कपडे त्यांना का द्यायचे? त्या या भरपूर जुन्या कपड्यांचं करतात काय? ठेवतात कुठं? त्यांना पाहिजेच तर आपण आईला सांगू ना जुनेरी नको देत जाऊ नवीनच लुगडं घेऊन देऊयात. असे एक ना अनेक प्रश्न पडायचे. मग घरातल्यांनी त्यांच्यापरीनं माझं शंकानिरसन केलं.

बोहारीण हा गावगाड्याचाच एक भाग!  दारोदारी जायचं अन् जुने कपडे गोळा करायचे. मग ते वस्तीच्या ठिकाणी न्यायचे. त्यातल्या कपड्यांचं प्रकारानुसार वर्गीकरण करायचं. जरीकाठाचे वेगळे, सुती वेगळे, पाॅलिस्टर वेगळे, फ्राॅक वेगळे तर शर्ट निराळे असं प्रकार, पोत याप्रमाणं वर्गीकरण झालं की त्यातल्या चांगल्या स्थितीत असणाऱ्या कपड्यांना ओढ्यापाशी, तलाव नाहीतर घाटापाशी नेऊन ते धुवायचे, वाळवायचे आणि कडक इस्त्री करायची, जिथं थोडीफार डागडुजी करायची आहे जसं की एखादं बटनच तुटलंय, थोडासा खोंबाराच लागलाय, किंवा शिवणच उसवलीय वगैरे काही असेल तर ती हातशिलाईची कामं करून तेही कपडे व्यवस्थित करून घ्यायचे अन् जुन्या कपड्यांच्या बाजारपेठेत न्यायचे. जे डागडुजीपलिकडं गेले असतील असे कपडे निरनिराळ्या कारखान्यांत पार्ट्स पुसणे, बांधणे इ कामांकरता वापरले जाई. आजही कोल्हापुरात उद्यमनगरात गेलं की एका ठराविक वारी जुन्या कापडांचे गठ्ठे घेऊन काही लोक ते विकताना दिसतील. या सर्व उपद्व्यापातून त्यांची आमदानी कुटुंबापाठीमागं फार काही नसे. तरीही आपलं ते काम बोहारीण लोक न चुकता नेमानं करत.

घरोघरी जाऊन कपडे गोळा करणे, ते वस्तीवर आणणं, साफ करणं ही कामं बायकाच करतात. त्या अशिक्षित असल्या तरी व्यवहारकुशल निश्चितच असतात. ज्या त्या घराची, तिथल्या बाईची गरज, आवड अन् स्वभाव सारं अत्यंत चाणाक्षपणे त्या अभ्यासून प्रत्येकवेळेला घरच्या बाईला अवडेल अशी खास पोतडीतली भांडी त्यांच्याकडं असतात. या बोहारीण बायकांच्या घरचे पुरुष बाजारात ठरल्या व्यवहाराला माल देणे इतकं बघणे हे काम करतात. पण मुख्य अन् खूप कष्टाचं काम या बायकाच करतात.

दिवसभर, उन्हापावसात ती भांड्यांनी जड झालेली शिफ्तरं, कपड्यांची जड गाठोडी घेऊन पायपीट करायची. प्रत्येक घरात आपुलकीनं वागलं जाईलच असं नाही. अनेकजण त्यांच्या अंगावर खेकसतील तर अन् अनेकजण आपण त्यांच्यावर उपकारच करतो आहोत या भावनेनं त्यांच्याशी वागतील. फार कमी लोक त्यांच्याशी माणसाप्रमाणे वागतात- वागत...वागत यासाठी की आता बोहारीण इ. दिसत नाही. गेटेड सोसायटी, वाॅचमन, 'सेल्समनला परवानगी नाही' या साऱ्याच्या जमान्यात बोहारीण दिसणं तसं दुर्मिळ झालं आहे. आणि क्वचित एखादी जुन्या कपड्यांवर भांडी देणारी कुणी दिसलीच तरी तिच्याकडं हिंडालायम, जर्मेनियम, स्टिलची भांडी नसून प्लास्टिकची भांडी, खुर्च्या असं काहीबाही दिसतं. गावगाड्याचा हा भाग आता अस्तंगत होत चालला आहे का असा प्रश्न अनेकदा पडतो.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com