‘उपपदार्थ निर्मितीतून शेतकऱ्यांना अधिकचा लाभ देणे शक्य’

आमदार अशोकबापू पवार यांची ‘वसंतदादा’च्या नियामक मंडळावर निवड
MLA Ashok Pawar
MLA Ashok PawarAgrowon

पुणे : ‘‘साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर (Sugar Production) अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीकडेही (Production Of By-Product) वाटचाल करणे गरजेचे आहे. डिस्टिलरीसारख्या प्रकल्पामुळे मिळणाऱ्या अधिकच्या उत्पन्नातून कारखान्यास ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसह कारखाना कर्मचाऱ्यांनाही अधिकचा लाभ मिळवून देता येईल,’’ असे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोकबापू पवार (Ashok Pawar) यांनी केले.

आमदार ॲड. अशोक पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasatdada Sugar Institute) नियामक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच व्यंकटेशकृपा शुगर मिल्सच्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ दिल्याबद्दल व्यंकटेशकृपा शुगर मिल्सचे अध्यक्ष संदीप तौर यांचा सत्कार जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे व्यंकटेशकृपा शुगर मिल्सच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने मंगळवारी (ता.३) करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खात्याच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सुजाता पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्मिता तौर उपस्थित होत्या. या वेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, कारखान्याचे संचालक बिजवंत शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या धनश्री चव्हाण, जनरल मॅनेजर बी. आर. सायकर, सहायक व्यवस्थापक व्ही. यू. सोनवणे, व्यवस्थापक ए. एच. अडत, केन मॅनेजर, पी. बी. वामन, सुरक्षा अधिकारी एस. पी. भगत आदी उपस्थित होते.

आमदार श्री. पवार म्हणाले, ‘‘व्यंकटेशकृपा शुगर मिल्स हा देश पातळीवर नावाजलेला अत्याधुनिक साखर कारखाना असून, इतर कारखान्यांच्या तुलनेत अध्यक्ष व व्यवस्थापनाकडून कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर कमी जागेत चांगला चालवला जात आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. कारखान्याने नुकत्याच पार पाडलेल्या गळीत हंगामात मागील हंगामांपेक्षा सर्वोच्च ७ लाख १२ हजार ३५५ टन इतके गाळप करून ८ लाख ३७ हजार ५० क्विंटल साखर उत्पादन केले. सरासरी ११.७५ इतका साखर उतारा राखल्याबद्दल त्यांनी व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले.

व्यंकटेशकृपा शुगर मिल्सचे अध्यक्ष संदीप तौर म्हणाले, ‘‘यंदा कारखान्याचा साखर उतारा जादा असल्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अधिक दर देता येऊ शकेल.’’ असा विश्‍वास व्यक्त करून त्यांनी आमदार पवार यांना शुभेच्छा देऊन सत्काराबाबत कर्मचाऱ्यांचे आभारही मानले. कार्यक्रमात लेबर ऑफिसर ए. पी. शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. जनरल मॅनेजर बी. आर. सायकर यांनी प्रास्ताविक केले. केन मॅनेजर पी. बी. वामन यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com