कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडणार

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडणार
RainAgrowon

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर (K Hosalikar) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

राज्यात आज मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण भागातील काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यात पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हा मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी, अशी सूचना होसाळीकर यांनी केली आहे.

दरम्यान, मॉन्सून अजून राज्यात पोहोचलेला नसून हा पूर्वमोसमी पाऊस आहे. यंदा मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. ३१) जाहीर केला होता. शेतीसाठी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिरायती भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६) टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात यंदा दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १४ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढवून तो १०३ टक्के करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com