
Jalgaon APMC Election : जिल्ह्यात सहा बाजार समितीच्या निवडणुकीसंबंधी रविवारी (ता.३०) मतमोजणी झाली. त्यात जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पॅनेल पराभूत झाले. तर धुळ्यात धुळे बाजार समितीमध्ये भाजप- भदाणे गटाला पराभवाचा सामना करावा लागला.
धुळ्यात काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनेलचा १५ जागांवर विजय झाला आहे. यापूर्वी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यात एक भाजप व एक काँग्रेसतर्फे निवडून आली होती.
जळगाव जिल्ह्यात बहुचर्चित जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने ११ जागांवर विजय मिळवून सत्ता खेचली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी शिवसेनेतील नाराज मंडळीला एकत्र आणले व निवडणुकीचे नियोजन केले आणि यशस्वी झाले.
यावल (जि.जळगाव) बाजार समितीत महायुतीच्या पॅनेलने १५ जागांवर विजय मिळवून सत्ता आणली. तेथे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, शरद महाजन यांनी सूक्ष्म नियोजन करून विजय मिळविला.
काँग्रेसचे रावेरमधील आमदार शिरीष चौधरी यांना तेथे धक्का बसला. धरणगाव (जि.जळगाव) बाजार समितीत पालकमंत्री गुलाबराव यांच्या समर्थकांनी सर्व १८ जागांवर विजय प्राप्त केला.
बोदवड बाजार समितीमध्ये १७ जागांवर महाविकास आघाडीने विजयश्री खेचली. तेथे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यांचा फक्त एक समर्थक तेथे निवडून आला.
पाचोरा येथील बाजार समितीत त्रीशंकु स्थिती निर्माण झाली आहे. वैशाली सूर्यवंशी, अमळनेर बाजार समितीतदेखील महाविकास आघाडीने बहुमत मिळवून सत्ता खेचली.
जळगाव, मुक्ताईनगरात पैशांचा महापूर
जळगाव, मुक्ताईनगरात पैशांचा महापूर आल्याची चर्चा सुरू होती. अशात मतदान झाले. मतदानाच्या वेळेसही मतदारांना प्रलोभने देण्यात आली. परंतु निकाल वेगळेच लागले, यामुळे लक्ष्मीदर्शन घेतले, पण मत फुटले, अशी चर्चाही गमतीने जळगावात सुरू होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.