मुख्यमंत्री साहेब, नुसती भावनिक साद घालून चालणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करणारे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. शेतकऱ्यांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन (Emotional Appeal To Farmer From Eknath Shinde) करणारे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. शेतकऱ्यांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. पण त्याबरोबरच, नुसत्या भावना व्यक्त करून होणार नाही तर कृषी विकासासाठी ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा रोखठोक अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांना वाढीव दराने भरपाईचा आदेश

‘शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका... आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या अस्मानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश सामावलेले असते... आहे याची खात्री बाळगा...’, अशी भावनिक साद मुख्यमंत्री शिंदे यांनी घातली. या पत्रावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Crop Damage
Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी नैराश्यात आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याने आता दुबार पेरण्या करणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने प्रति हेक्टरी मदत वाढवून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे; मात्र अशा मदतीने शेतकरी उभा राहणार का, असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. बँका उभ्या करत नसल्याने हाती भांडवल नसून सावकारी, पदरमोड, उसनवारी करून शेतकऱ्यांनी शेती जिवंत ठेवली आहे. वातावरणीय बदलांमुळे नुकसान वाढते आहे. निविष्ठांचे दर गगनाला भिडले. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकवलेल्या शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही. शेतीमालावर प्रक्रिया करायचा सल्ला दिला जातो, मात्र त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही, अशा गंभीर परिस्थितीत शेतकरी पेचात सापडल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करा, असे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या अपेक्षा

शेतीमालाला हमीभाव किंवा उत्पादन खर्चावर अपेक्षित दर.

आधुनिक तंत्रज्ञान व शेतकऱ्याची क्षमताबांधणी.

कृषी पंपासाठी दिवसा व अल्प दरात पूर्ण दाबाने वीजपुरवठा.

रास्त दरात खते व औषधे, कृत्रिम खतटंचाईवर बारकाईने लक्ष.

सार्वजनिक सिंचन स्रोत व वितरण प्रणालीचे बळकटीकरण.

क्षेत्रीय पातळीवर कृषी विभागाच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन.

शेतीसह पूरक उद्योगांसाठी योजना.

बाजारपेठ जोडणी व शेतीमाल वाहतुकीसाठी पक्क्या दर्जेदार रस्त्यांची उभारणी.

शेतीमाल निर्यातीसाठी प्रोत्साहन.

खासगी किंवा सरकारी स्वरूपात शीतगृह व प्रक्रिया उद्योगांची उभारणी

संरक्षित शेतीसाठी अनुदान.

पीकविमा नुकसानभरपाई पारदर्शक योजना.

महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कृषी विद्यापीठांचे आधुनिकीकरण करावे. हवामान विभाग अद्ययावत करावा. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन सल्ला, हवामान विषयक अचूक माहिती मिळू शकेल. शेतीमाल विक्री प्रणाली पारदर्शी करावी, कृषी समित्यांमध्ये सरकारी सहभाग असावा. कर्जमाफी, अनुदान मदत बंद व्हावे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर रास्त दर मिळावेत. शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
योगेश्‍वर बोराडे, तरुण शेतकरी, थेरगाव, ता. निफाड
प्रत्येक पक्ष सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरून जातात हे आतापर्यंतचे वास्तव आहे. फक्त कर्जमाफी नको, हमीभाव मिळाला तर नक्कीच आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना एक आशा आहे.
शांताराम कमानकर, शेतकरी-भेंडाळी, ता. निफाड

मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’कडे व्यक्त केलेल्या भावना '

विचार आणि व्हिजन चांगले आहे; पण सर्व गोंधळ बघितल्यावर मुख्यमंत्र्यांना किती वेळ मिळेल यात शंका. कामापेक्षा घोषणेचा पाऊस नको व्हायला.

कृषी व संशोधन केंद्र नावापुरतीच उरली आहे, त्या माध्यमातून शेती विकासासाठी संशोधन होणार का? शेतकऱ्याचा राजकीय नेत्यांवर विश्‍वास राहिलेला नाही.

शेती पिकवणे ही फक्त शेतकऱ्यांची गरज नसून यात जनता व सरकारी यंत्रणेची महत्त्वाची भूमिका आहे.

फसवणूक टाळण्यासाठी व्यापारी वर्गाची नोंदणी बाजारपेठेत पारदर्शकता आणणार का?

कृषी विभागाकडून लागवडी व संभाव्य उत्पादनसंबंधी जाहीर होणारी माहिती यात गोंधळ असतो, यात सुधारणा करण्यात येतील का?

राज्य सरकारने वीजबिल माफ करू नये; पण व्यवहार्य बिले आकारावीत.

एका दाण्याचे हजार दाणे तयार करणारा शेतकरी तोट्यात कसा, यावर मंथन होणार की नाही?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com