
ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : नांदगाव तालुक्यात नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवित पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता राखली आहे.
मात्र मनमाड येथे कांदे यांच्या पॅनलचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलला अपक्षांसह १४ जागा, आमदार सुहास कांदे यांच्या पॅनेलला ३ तर हमाल मापारी गट अपक्ष १ जागा मिळाली आहे.
नांदगावमध्ये कांदे यांनी सत्ता राखली; तर मनमाडमध्ये भुजबळ यांच्या पॅनेलने बाजी मारली.
नांदगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी वर्चस्व प्रस्थापित करताना पाच माजी आमदारांच्या आव्हानाला त्यांनी हादरा दिला.
विरोधी गटाचे मविप्रचे संचालक अमित पाटील (Amit Patil) व माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले.
हमाल मापारी गटातून अपक्ष असलेल्या नीलेश इप्पर यांनी सलग वीस वर्षे संचालक राहिलेल्या आमदार कांदे गटाचे भास्कर कासार यांचा पराभव केला. सात वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतही कांदे-कवडे गटाला पंधरा जागा मिळाल्या होत्या.
यंदाही त्याच निकालाची पुनरावृत्ती झाली, मात्र तशी होताना माजी सभापती विलास आहेर यांचा झालेला पराभव आमदार गटाला जिव्हारी लागणारा ठरला.
त्यांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक व ‘मविप्र’चे संचालक अमित पाटील यांनी बावीस मतांनी पराभूत केले.
माजी आमदार ॲड. आहेर यांचे पुत्र दर्शन आहेर यांच्या राजकीय कारकीर्दीचा या निवडणुकीतून श्रीगणेशा झाला.
मनमाड बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणीत परिवर्तन पॅनेलला अपक्षांसह १४ जागा, शिंदे गट ३ तर हमाल मापारी गट अपक्ष १ जागा मिळाली आहे.
व्यापारी गटातील २ अपक्ष उमेदवार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेऊन परिवर्तन पॅनेलला पाठिंबा जाहीर केला असल्याने भुजबळांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.
या निवडणुकीतील सर्व सूत्र ऐनवेळी समीर भुजबळ यांनी हातात घेतली. त्यांनी या निवडणुकीत अतिशय सूक्ष्म असे नियोजन केले. त्यामुळे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनेलला भरघोस यश मिळाले आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता मिळवू असे म्हणणाऱ्या आमदार सुहास कांदे यांना मतदारांनी चांगलाच दणका दिला असून या निवडणुकीत त्यांचं पूर्णतः पानिपत झाले.
या निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.