
जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळी (Kandebag Banana Cultivation) (सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या केळी बागा) लागवड (Banana Cucumber Outbreak) मध्यंतरी झालेल्या पावसाने रखडली आहे. शेताची पूर्वमशागत करणे शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
गेले तीन दिवस ऊन-सावली व ढगाळ वातावरण, अधिक आर्द्रता, अशी स्थिती आहे. हवादेखील असते. पण पूर्णतः कोरडे वातावरण नाही. कोरडे वातावरण असल्यास शेताची ट्रॅक्टरने पूर्वमशागत, गादीवाफे तयार करणे किंवा सऱ्या पाडणेही शक्य होईल. खानदेशात तापी, अनेर, गिरणा, कांग, तोंडापूर धरण क्षेत्रात कांदेबाग केळीची लागवड केली जाते. काही शेतकऱ्यांनी आगाप लागवडीसाठी क्षेत्र नापेर ठेवले होते.
तर तापी, अनेर पट्ट्यात शेतकरी बेवडसाठी उडीद, मूग, धैंचाची पेरणी करतात. ही पिके जमिनीत गाडून त्यात सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरमध्ये केळीची लागवड करतात. परंतु यंदा पाऊस २० सप्टेंबरपर्यंत जोरात सुरूच होता. मागील तीन-चार दिवस पाऊस अपवाद वगळता झालेला नाही. परंतु पूर्णतः कोरडे, स्वच्छ सूर्यप्रकाशात वातावरणदेखील नाही. पावसाची भीती आहे.
काळ्या कसदार जमिनीत वाफसा झालेला नाही. त्यात ट्रॅक्टरने नांगरणी, रोटाव्हेटर व पुढे गादीवाफे तयार करणे यासाठी वाफसा हवा आहे. वाफसा नसल्याने पूर्वमशागत केल्यास माती कडक होण्याची शक्यता असते. तसेच काही शेतकऱ्यांचे उडीद, धैंचा शेतात उभेच आहेत. ते जमिनीत गाडून नंतर पूर्वमशागत केली जाईल.
यामुळे केळी लागवड रखडली आहे किंवा ती लांबणीवर पडली आहे. पुढे आणखी दोन ते तीन दिवस कोरडे वातावरण राहिल्यास एकाच दिवसात नांगरणी, रोटाव्हेटरचे काम शेतकरी उरकतील. लागलीच केळी लागवडदेखील सुरू होईल.
काळ्या कसदार जमिनीत लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतील कंद वापरले जातात. तर मध्यम, हलक्या जमिनीत लागवडीसाठी काळ्या कसदार जमिनीतील कंद वापरले जातात. कंदांसाठी शेतकरी नंदुरबारमधील शहादा, तळोदा, औरंगाबादमधील सोयगाव, कन्नड, जामनेरातील तोंडापूर, रावेरातील सावदा व परिसरात चाचपणी करीत आहेत.
कारण लागवडीचे नियोजन कंदा उपलब्ध झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. दर्जेदार वाणांचे कंद शेतकरी कांदेबाग केळीसाठी वापरतात. तसेच काही शेतकऱ्यांनी उतिसंवर्धित रोपांची लागवड करण्याचे नियोजनही केले आहे.
जवळपास दहा हजार हेक्टरवर लागवड...
जळगावात चोपडा, जळगाव, जामनेर, भडगाव, पाचोरा भागात कांदेबाग केळीची लागवड केली जाते. तसेच धुळ्यातील शिरपुरातही लागवड असते. जळगाव जिल्ह्यात सुमारे सात ते साडेसात हेक्टरवर लागवड होईल. तर धुळ्यात सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर कांदेबाग केळी पीक असणार आहे. जलसाठे मुबलक आहेत. यामुळे लागवड स्थिर राहील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.