Kartiki Wari : कार्तिकीसाठी पंढरीत फुलला भक्तीचा मळा

सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी; चंद्रभागानदीसह नगरप्रदक्षिणा मार्गावर गर्दी
 Kartiki Wari
Kartiki WariAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः कार्तिकी वारी अर्थात प्रबोधिनी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी शुक्रवारी (ता. ४) राज्याच्या कानाकोपऱ्यांतून सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले असून, अवघ्या पंढरपुरात टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने जणू भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र आहे.

 Kartiki Wari
Kartiki Wari : कार्तिकीच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पहाटे अडीचच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. त्या दरम्यान काही काळ दर्शनरांग थांबवण्यात आली, पण पुन्हा ती सुरू करण्यात आली. पण आधीही गेल्या दोन दिवसांपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनासह मुख दर्शनाला मोठी रांग आहे. आज पदस्पर्श दर्शनासाठी १५ ते १६ तास लागत होते.

पहाटेपासून कार्तिकी एकादशीच्या स्नानासाठी चंद्रभागा नदीवर वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. नदीतून स्नान घेतल्यानंतर काही वारकरी पदस्पर्शदर्शन, काही मुखदर्शन, तर काही नगरप्रदक्षिणा मार्गाकडे वळत होते. चंद्रभागानदीतील वाळवंटासह ६५ एकर परिसर आणि मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्गावर दिंड्यांच्या प्रदक्षिणा सुरू होत्या. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.

 Kartiki Wari
Aashadhi Wari | वारकऱ्यांना सोई-सुविधा कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री शिंदे

त्याशिवाय शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये रात्रभर भजन- कीर्तनासच प्रवचने रंगली. त्यामुळे अवघ्या पंढरी भक्तिरसात न्हाऊन गेल्याचे चित्र आहे. दिवसभर सातत्याने एसटी आणि रेल्वेतून वारकरी पंढरीत दाखल होत होते. त्यामुळे गर्दीत सातत्याने वाढ होत होती.

दर्शनरांगेत वारकऱ्यांची सोय
पदस्पर्श दर्शनरांगेसाठी मुख्य मंडपाबाहेर गोपाळपूर रस्त्यापर्यंत तात्पुरते पत्राशेड उभारण्यात आले आहेत. शुक्रवारी आठव्या शेडच्याही पुढे गर्दी पोहोचली. या शेडवर वारकऱ्यांना ऊन लागू नये, यासाठी सावलीही करण्यात आली आहे. तसेच रांगेतील वारकऱ्यांना चहा-पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनरांगेतून दर्शनासाठी साधारण १५ ते १६ तासांचा कालावधी लागत होता. तर प्रतिमिनिटाला ४० ते ५० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com