Kartiki Wari
Kartiki WariAgrowon

Kartiki Wari : कार्तिकीच्या सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी

पंढरीत सुमारे तीन लाखांपर्यंत वारकरी दाखल; आज कार्तिकीचा मुख्य सोहळा


अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः
अवघीया संता एक वेळ भेटी ।
पुंडलिक दृष्टी देखिलिया ।।
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक ।
विठ्ठलची एक देखिलिया ।।
या संतोक्तीप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाची आस ठेवून राज्याच्या कानाकोपऱ्यांतून शुक्रवारी (ता. ४) होणाऱ्या कार्तिकी वारी (Kartiki Wari) साठी वारकरी पंढरीत दाखल होत असून, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसाने भारून गेली आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे.

 Kartiki Wari
Ashadhi Wari : भक्तिरसात डुबलेला तो वारकरी

आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वाऱ्यांना वारकरी परंपरेत विशेष महत्त्व आहे. कोरोनामुळे शतकानुशतकांच्या वारी परंपरेत गेली दोन वर्षे खंड पडला होता. गेल्या वर्षीही तशी जेमतेम वारी झाली. पण यंदा परिस्थिती पूर्वपदावर असल्याने पूर्वीप्रमाणेच वारीचा उत्साह अवघ्या पंढरीत दाटलेला दिसतो. राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक आणि तेलंगणामधूनही वारकरी येत आहेत. शहरातील विविध देवदेवतांची मंदिरे, धर्मशाळा, मठांमधून भजन-भारुडे सुरू आहेत. अनेक ठिकाणी प्रवचने आणि कीर्तने रंगली आहेत. चंद्रभागा नदीच्या किनारीही ज्ञानोबा-तुकारामांसह माऊली, माउली असा जप सुरू आहे. चंद्रभागेतील दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने गुरुवारी (ता. ३) भल्या पहाटेपासूनच नदीवर वारकऱ्यांची स्नानासाठी दिवसभर झुंबड उडाल्याचे चित्र होते. विशेषतः नदी परिसर, नगरप्रदक्षिणा मार्गा, चौफाळा, एस.टी. स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे. नगरप्रदक्षिणा मार्गासह मंदिराकडील प्रमुख मार्गावर अरगजा, गुलाल-बुक्क्यासह प्रासादिक वास्तूंची दुकाने, गृहोपयोगी साहित्य, लहान मुलांची खेळणी यांसह विविध प्रकारची दुकाने थाटल्याने खरेदीसाठी इथे गर्दी दिसत आहे. या वारीसाठी एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांनीही वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. त्यामुळे क्षणाक्षणाला गर्दीत वाढ होते आहे.

 Kartiki Wari
Kartiki Ekadashi : पंढरपुरात कार्तिकी यात्रेसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण


दर्शनरांगेसह मुखदर्शनालाही गर्दी
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेसह मुखदर्शनाच्या रांगेतही मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. दर्शनाची रांग दोन दिवसाआधीच गोपाळपूर रस्त्याच्या चार नंबर पत्राशेडच्याही पुढे गेली आहे. आजही तीच परिस्थिती राहिली. दर्शनरांगेतून दर्शनासाठी साधारण १३ ते १५ तासांचा कालावधी लागतो आहे. तर एका मिनिटाला ४० ते ५० वारकरी दर्शन करून बाहेर पडत आहेत.


उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
कार्तिकी वारीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शुक्रवारी पहाटे अडीच वाजता होणार आहे. त्यासाठी गुरुवारी सायंकाळी उशिरा उपमुख्यमंत्री फडणवीस पंढरीत दाखल होतील. शुक्रवारी महापूजेनंतर शहरातील काही कार्यक्रमांना फडणवीस उपस्थित राहणार आहेत. नव्याने सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने पंढरीच्या विकासासाठी काही नव्या योजनांची घोषणा ते करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com