तंत्रज्ञानाचा प्रसार न होणे हे कृषी यंत्रणांचे अपयश: ‘आयसीएआर’ महासंचालकांची खंत

वातावरणातील बदलामुळे शेतीक्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले आहे. भारतातच नाही तर जागतिकस्तरावर हा चिंतेचा विषय झाला आहे. या बदलाची दखल भारतीय कृषी संशोधन परिषदेने फार पूर्वी घेत संशोधनात्मक पातळीवर त्यानुरूप बदलांना प्राधान्य दिले.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

नागपूरः ‘‘वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाताना भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गतच्या संशोधक संस्थांनी त्यानुरूप आपल्या संशोधनाच्या कक्षा विस्तारत अनेक प्रकारचे वाण, शिफारशी आणि तंत्रज्ञान दिले. ‘केव्हीके’च्या प्रक्षेत्रांवर प्रथमरेषीय प्रात्याक्षीकांद्वारे त्याचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे संशोधनात्मक टप्प्यावर आम्ही समाधानी आहोत. मात्र त्याचवेळी विस्तारकामात संबंधित राज्यांमध्ये कृषी विभागाची यंत्रणा कमी पडत आहे,’’ अशी खंत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा (Trilochan Mahapatara) यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केली.

लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्ताने रविवारी ते नागपुरात आले होते. या वेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. डॉ. महापात्रा म्हणाले, ‘‘वातावरणातील बदलामुळे शेतीक्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले आहे. भारतातच नाही तर जागतिकस्तरावर हा चिंतेचा विषय झाला आहे. या बदलाची दखल भारतीय कृषी संशोधन परिषदेने फार पूर्वी घेत संशोधनात्मक पातळीवर त्यानुरूप बदलांना प्राधान्य दिले. देशभरातील संशोधन संस्थांद्वारे आजवर सुमारे १६०० प्रकारची वाण विकसित करण्यात आली. त्यातील तब्बल ८० टक्‍के वाण हे बदलत्या हवामानात सहनशील अशा स्वरूपाचे आहेत.

Agriculture Technology
मका उत्पादकतेत भारत पिछाडीवर का?

‘‘मॉन्सून काळात पडणाऱ्या पावसाचे दिवसमान अनिश्‍चित झाले आहे. अनेक राज्यांमध्ये धो-धो बरसत पाऊस सरासरी गाठतो. सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पावसात मोठा खंड पडतो. त्यानंतर ऐन काढणीच्यावेळी पाऊस पडतो, अशी स्थिती अनेक राज्यांमध्ये अनुभवली गेली आहे. पावसाचा खंड पिकाच्या फुलोरा अवस्थेत पडत असल्याने अशावेळी संरक्षित सिंचन स्त्रोतांमधून पाण्याचा उपसा करीत ते ठिबक, तुषार अशा माध्यमातून दिले पाहिजे, अशी शिफारस आहे,’’ असेही डॉ. महापात्रा म्हणाले.

‘‘पडणाऱ्या पावसाचा संचय करणे किंवा ते जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. नंतर त्याचा वापर करता येईल. उसासारख्या पिकाला पाणी अधिक लागते. मात्र ते पाटाने न देता ठिबकने दिले पाहिजे. मातीचे गुणधर्म अभ्यासत पिकाची निवड झाली पाहिजे. त्याशिवाय पीक उत्पादन खर्च कमी होणार नाही. अशा अनेक प्रकारच्या शिफारशी व तंत्रज्ञान संशोधन संस्थांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळेच देश आज अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

‘संशोधनाचा दर्जा राखण्यावर भर’

संशोधक संस्थांतील प्रत्येक शास्त्रज्ञाचे ‘थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन होते. त्याशिवाय त्यांना पदोन्नती किंवा पगारवाढ दिली जात नाही. त्यामुळे संशोधन संस्थांचे मूल्यांकन होत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरते. यावेळी ‘केव्हीके’च्या मूल्यांकनासाठी देशाबाहेरील संस्थेची मदत घेण्यात आली होती. संशोधनाचा दर्जा राखला जावा, यावर आमचा भर आहे.

‘विस्ताराची जबाबदारी ‘कृषी’कडे’

संशोधन करताना विस्तार कार्य देखील आमचीच जबाबदारी आहे, असे अनेकांना वाटते. केव्हीकेकडे विस्तार यंत्रणा म्हणून बघितले जाते. परंतु, प्रथम रेषीय प्रात्याक्षीकांचा उपक्रम राबविणे हेच ‘केव्हीके’चे काम आहे. विस्ताराची जबाबदारी मुख्यत्वे संबंधित राज्यातील कृषी विभागाकडे आहे. या कामात ‘कृषी’ची यंत्रणा कमी पडते. त्यामुळेच बांधापर्यंत तंत्रज्ञान पोचण्यात अडचणी येत आहेत,’’ अशी टीका डॉ. महापात्रा यांनी केली.

मग निर्यातबंदी का?

देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. त्यामुळे कोरोना काळात निःशुल्क अन्नधान्य वितरित करता आले. मग गहू निर्यातीवर बंदी का लादली, असा प्रश्‍न केला असता त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळत ती धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com