
धुळे ः मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गातील (Manmad-Indur-Dhue Railway) एक भाग असलेल्या बोरविहीर (ता. धुळे) ते नरडाणा (ता. शिंदखेडा) या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गासाठी (Railway Line) धुळे तालुक्यातील १९, तर शिंदखेडा तालुक्यातील पाच गावांमध्ये क्षेत्र मोजणीची प्रक्रिया (Land Survey) प्रस्तावित आहे. पैकी धुळे तालुक्यातील नऊ गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली असून, उर्वरित दहा गावांमधील मोजणी जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.
मध्य रेल्वे मंत्रालयाकडील २२ फेब्रुवारी २०२२ च्या अधिसूचनेनुसार बोरविहीर ते नरडाणा या ५०.५६ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया रेल्वे अधिनियमान्वये विशेष रेल परियोजना म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे. तसेच २५ मार्च २०२२ च्या अधिसूचनेन्वये तरतुदीनुसार कार्यवाहीसाठी धुळे तालुक्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रातांधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
या अनुषंगाने भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू करून भारत सरकार राजपत्रामध्ये २० (अ)ची अधिसूचना २० मे २०२२ ला प्रसिद्ध झाली आहे. भूसंपादनाचा मोबदला हा भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कायद्यानुसार अदा करण्यात येणार आहे. योग्य मोबदल्यासाठी ड्रोन सर्व्हेद्वारे परीक्षण, जमिनीच्या सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आल्या आहेत.
धुळे तालुक्यात प्रक्रिया
बोरविहीर-नरडाणा रेल्वेसाठी धुळे तालुक्यातील गरताड, दापुरी, कुंडाणे, दापुरा, कापडणे, धमाणे, नरव्हाळ, न्याहळोद, निमखेडी, पिंपरी, बाळापूर-फागणे, बिलाडी, वडजाई, लोणकुटे, सरवड, सावळदे, सोनगीर, वरखेडे, सौंदाणे आदी क्षेत्रात भूसंपादनाबाबत योग्य ती प्रक्रिया राबविली जात आहे.
यात सरकारी (४.३४५ हेक्टर) व खासगी जमिनीचे (३०१.३८ हेक्टर) संपादन होण्यापूर्वी डिमार्केशन केले जात आहे. भूसंपादनाबाबत संबंधित जमीनमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. धुळे हे रेल्वेच्या सेंट्रल लाइनवर, तर नरडाणा वेस्टर्न लाइनवर येते. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजेच बोरविहीर ते नरडाणा हा रेल्वेमार्ग आहे. तो झाल्यास गुजरात आणि दक्षिण भारतालाही धुळे जिल्हा जोडला जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.