मराठवाड्यात पाच जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५० मंडलांत शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, मध्यम ते दमदार पाऊस झाला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

औरंगाबाद : पावसाच्या (Rain) लहरीपणाचा अनुभव शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतही आला. औरंगाबाद, बीड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (Rain Force) अधिक राहिला. तर लातूर, उस्मानाबाद, जालन्यातील अपवाद वगळता बहुतांश मंडलांत तुरळक, हलकाच पाऊस (Light Rain) झाला. बीडमधील एका मंडलात मात्र अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५० मंडलांत शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तुरळक, मध्यम ते दमदार पाऊस झाला. १२ मंडलांत २० ते ४५ मिलिमीटर पाऊस झाला. सोयगाव, फुलंब्रीकडे पावसाने पाठ फिरवली. तर सिल्लोड तालुक्यातील बहुतांश मंडलांत तुरळकच पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील ५ पैठणमधील ३, गंगापूरमधील ३, सिल्लोडमधील २ मंडलांत पावसाची हजेरी दखलपात्र राहिली.

जालना जिल्ह्यातील एकूण २३ पैकी १३ मंडलांत तुरळक ते हलका पाऊस झाला. भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर, घनसावंगी, मंठा आदी तालुक्यांतील अपवाद वगळता बहुतांश मंडलांकडे पावसाने पाठच फिरविली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ६० मंडलांत पावसाची हलकी हजेरी लागली. २७ मंडलांत २० ते ५१ मिलिमीटर पाऊस झाला. गेवराई तालुक्यातील देवकी मंडलात ७९ मिलिमीटर पाऊस झाला. वडवणी धारूर, परळी, अंबाजोगाई, गेवराई तालुक्यांत बहुतांश मंडलांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ४७ मंडलांत हलका पाऊस झाला. आठ मंडलांत २० ते ५० मिलिमीटर पाऊस झाला. निलंगा तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. तर औसा तालुक्यात पावसाची हजेरी तुरळकच राहिली.

उस्मानाबादमध्ये पेरणीची प्रतीक्षा

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ १५ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. उमरगा, लोहारा, परांडा तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली. तसेच तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्‍यांतील बहुतांश मंडलांत पावसाचा टिपूसही बरसला नाही. पावसाचा हा लहरीपणा खरिपाच्या पेरणीला नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे पेरणीयोग्य व सर्वदूर पाऊस सक्रिय कधी होणार? याची चिंता पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com