अपक्षांची विधान परिषद निवडणूकीसाठी मनधरणी

आमदारांचा मुक्काम पुन्हा हॉटेलमध्ये
अपक्षांची विधान परिषद निवडणूकीसाठी मनधरणी
MLC ElectionAgrowon

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC Election) महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपल्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला झटका दिल्यानंतर आता या अपक्षांची (Independent MLA) मनधरणी करण्यासाठी उमेदवार संपर्क साधत आहेत. तर दक्षतेसाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे. त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतांची बेगमी असल्याने त्यांच्या प्रत्येकी दोन जागा निश्चित मानल्या जात आहेत. मात्र, काँग्रेसची दुसरी जागा अद्यापही सुरक्षित नाही. भाई जगताप यांना काँग्रेसनेच दुसऱ्या क्रमांकाची उमेदवारी दिली आहे. भाजपने प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये चुरशीने लढत होण्याची शक्यता आहे. जगताप यांनी बुधवारी (ता.१६) बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

भाजपने या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर धक्कादायक निकाल लागला होता. ठाकूर यांची नाराजी काढण्यासाठी भाई जगताप यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकूर आपल्यालाच मतदान करतील, असे त्यांनी सांगितले. प्रसाद लाड यांच्या विजयाचे गणित जुळविण्यासाठी भाजपला २२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपसाठीही ही लढाई सोपी नसेल.

पुन्हा हॉटेल मुक्काम

राज्यसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. शिवसेना आमदार असलेल्या ट्रायडंटमध्ये भाजपचे उमेदवार धनंजय महाडीक, आशिष शेलारही गेल्याने अनेक चर्चा होत होत्या. आता विधानपरिषदेसाठीही दक्षता म्हणून सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईत पाचारण केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com