
Khandesh Weather Update : खानदेशात मागील आठवड्यात झालेल्या वादळ, गारपीट (Hailstorm) व पावसात केळी व मका पिकाला मोठा फटका सर्वत्र बसला आहे. सुमारे ४७ हजार हेक्टरवर नुकसान (Crop Damage) झाले आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल बुधवारी (ता. ३) प्राप्त होण्याची शक्यता आहे.
केळीची जळगाव, जामनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, मुक्ताईनगर, रावेर आदी भागात अधिकची हानी झाली आहे. धुळ्यात शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातही केळीला फटका बसला आहे. विमाधारकांनी नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत कार्यवाही सुरू झालेली नसल्याची माहिती आहे.
खानदेशात सर्वाधिक जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यातील वादळ, पावसाने नुकसान झाले. हे नुकसान ३२ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. गारपीटदेखील अनेक भागात झाल्याने मक्याला फटका बसला.
उभे पीक आडवे झाले किंवा मळणीवर आलेले पीक खराब झाले आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यात टोमॅटो, कांदा, गिलके, आंबा, कारली आदी पिकांना मोठा फटका बसला आहे.
नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत. काही भागात कमी नुकसान असल्याचे सांगून तलाठ्यांनी पंचनामे टाळले आहेत. शनिवार, रविवार व सोमवारची महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती. यामुळे पंचनाम्यांचे काम रखडले.
तलाठी आपल्या कार्यालयात आलेच नाहीत. यामुळे नुकसानीचे पंचनामे केले जातील का, केव्हा होतील, हादेखील प्रश्न अनेक भागात आहे. जळगाव जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी पाहणी करून तातडीने नुकसान भरपाईसंबंधी सूचना केल्या आहेत.
मका पिकाची मळणी लांबली
मका पिकाची मळणी कणसे ओली झाल्याने लांबली आहे. कारण मळणीसाठी कोरडे वातावरण हवे आहे. परंतु कोरडे वातावरण खानदेशात मागील अनेक दिवस नाही. यातच दरांवर दबाव वाढला आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी गोळा केलेल्या कणसांची मळणी टाळली आहे. दरवाढीनंतर मळणी करून त्याची विक्री करण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. तसेच बाजरीची मळणी, पपई व केळीची काढणीदेखील रखडली आहे. सर्व शेतीमालाच्या दरांवर प्रतिकूल वातावरणामुळे दबाव वाढला आहे. यामुळे मोठा वित्तीय फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.