
नाशिक : ‘‘राज्यातील फलोत्पादन पिकांसंबंधित कृषी व्यवसाय व मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र ॲग्रीबिजनेस नेटवर्क’ (मॅग्नेट) (MagNet)प्रकल्प आहे. या प्रकल्पात एकूण ११ फलोत्पादन पिकांचा (Fruit Producing Crops)समावेश आहे. त्यात डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, चिकू, पेरू, स्ट्रॉबेरी, भेंडी, लाल व हिरवी, मिरची व फुलांचा समावेश आहे.
हा प्रकल्प २०२६-२७ या कालावधीपर्यंत राबविण्यात येईल. लाभासाठी सोमवारपर्यंत (ता. १०) दुपारी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील’’, अशी माहिती पणन मंडळाचे नाशिक विभागीय उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांनी दिली. कृषी व्यवसायांशी निगडित संस्था व शेतकरी उत्पादक संस्थांचे सक्षमीकरण व त्यांची क्षमता बांधणी करण्याचा प्रयत्न आहे.
राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि आशियायी विकास बँक यांनी त्यासाठी अर्थसाह्य केले आहे. शेतकरी उत्पादक संस्था व मूल्यसाखळी गुंतवणूकदार यांच्या सक्षमीकरणसाठी काढणीपश्चात पायाभूत सुविधा उभारणीसाठी वित्तीय अर्थसाह्य व अनुदान उपलब्ध आहे. लाभार्थींकडून आलेल्या अर्जांचे मूल्यांकन करून त्यातून पहिल्या ६४ लाभार्थींची निवड होईल.
त्यांना प्रकल्प अहवालाच्या जास्तीत जास्त ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. सवलतीच्या दराने कर्ज मिळेल. अर्जदारांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर नोंदणी करून विहित नमुन्यातील अर्ज, पात्रतेचे निकष व सविस्तर तपशील, मूल्यांकनाचे निकष, कागदपत्रांची यादी आदी माहिती डाउनलोड करावी.
छापील अर्ज परिपूर्ण माहितीसह व आवश्यक कागदपत्रे, मूळ अर्जासोबत सहपत्रीत करून दोन प्रतीत प्रकल्प अंमलबजावणी कक्ष मॅग्नेट कार्यालय, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागाच्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, असे बारी यांनी सांगितले. .............
यांना करता येणार अर्ज
शेतकरी उत्पादक संस्था या घटकांतर्गत कंपनी कायदा अथवा सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणी झालेली शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा कार्यालयामार्फत नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र ग्रामिण जीवन उन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापित लोकसंचालित साधन केंद्र
तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन, असोसिएशन, मूल्यसाखळी गुंतवणूकदार या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक संस्था नसलेली मात्र निर्धारित ११ फलोत्पादक पिकांच्या उत्पादकांबरोबर कामकाज करीत असलेले प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रीगेटर, मध्य व मोठी स्वरूपातील विक्री संस्था, ॲग्री स्टार्टअप संस्था यांना अर्ज करता येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.