महाबीजकडून शेतकऱ्यांची फसवणुक: बच्चू कडू

सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून राज्यमंत्री बच्चु कडू यांनी सरकारच्या मालकीच्या महाबीज कंपनीला घरचा आहेर दिला आहे.
महाबीजकडून शेतकऱ्यांची फसवणुक: बच्चू कडू
Bachchu kaduAgrowon

सोयाबीनच्या (Soybean) बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून राज्यमंत्री बच्चु कडू (Bachchu Kadu) यांनी सरकारच्या मालकीच्या महाबीज (Mahabeej) कंपनीला घरचा आहेर दिला आहे. गेल्या वर्षी महाबीजकडील बियाणे संपल्यानंतर महाबीजने बाजार समित्यांमधून बियाणे खरेदी केले आणि तेच बियाणे महाबीजचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना विकले, अशा प्रकारे महाबीजने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या बियाण्यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात आता खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. हवामानशास्त्र विभागाने यंदा सरासरीपेक्षा १०३ टक्के अधिक पाऊस होईल, महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरलेल्या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाही सोयाबीनकडे ओढा वाढणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही सोयाबीनच्या बियाण्यांच्या टंचाईचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. महाबीजने सोयाबीन बियाण्याच्या दरात वाढ केल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महाबीजवर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

महाबीजचे बियाणे केवळ अनुदानावर मिळते म्हणून शेतकऱ्यांचा त्याकडे कल असतो. पण सरकारी अनुदान म्हणजे एखादा वाईट मित्र मिळाला म्हणून दारूची सवय लागते तशी आम्हाला अनुदानाची सवय सरकारने लावली, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी गटांनी एकत्र येऊन बियाणे तयार केले तर बियाणे उत्पादक कंपन्या बंद पडतील. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली उगवणक्षमता असलेले बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. चांगले बियाणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

दरम्यान, महाबीजवर आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा बियाण्यांच्या गुणवत्तेबद्दल महाबीजला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न खूपच पेटला होता.

राज्यभरातून बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. त्यात धक्कादायक बाब म्हणजे खासगी कंपन्यांबरोबरच महाबीज या सरकारी कंपनीचेही सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या होत्या. राज्यात खरीप व रब्बी हंगाम मिळून सुमारे २४ लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होते. त्यातील ४० टक्के बियाण्यांचा पुरवठा महाबीज व नॅशनल सीड कॉर्पोरेशनकडून केला जातो. या पार्श्वभूमीवर महाबीजवर आरोप होणे निश्चितच चिंताजनक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com