Maharashtra Cabinet :अखेर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार : १८ मंत्र्यांनी घेतली शपथ

शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नेमकी कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार याची चर्चा रंगली होती. न्यायालयीन लढाई आणि अंतर्गत मतभेद यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रखडल्याचे बोलले जात होते. आज अखेर नवीन मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
Eknath Shinde & Fadanvis
Eknath Shinde & FadanvisAgrowon

महिनाभरापेक्षा अधिक काळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.

राज्यातील सत्तांतरानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची व देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नेमकी कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार याची चर्चा रंगली होती. न्यायालयीन लढाई आणि अंतर्गत मतभेद यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे बोलले जात होते. आज अखेर नवीन मंत्र्यांना शपथ देण्यात आली.

आज पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाकडून उदय सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

आज शपथ घेतलेल्या एकूण १८ मंत्र्यांमध्ये मुंबई-कोकण विभाग, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, प. महाराष्ट्रातील प्रत्येकी चार आणि विदर्भातील दोन जणांचा समावेश आहे. दरम्यान शिंदे सरकारच्या या मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रीपदाची संधी देण्यात आलेली नाही. सुरुवातीला पुण्यातून आमदार माधुरी मिसाळ त्यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा होती.

शपथविधीसाठी पहिलेच नाव पुकारण्यात आले ते कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे. त्यांच्या नंतर भाजपचे विदर्भातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या विजयकुमार गावित यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि सलग सहा वेळा आमदार राहिलेल्या गिरीश महाजन यांचाही अपेक्षेप्रमाणे मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते सुरेश खाडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. २००४ पासून सलग चारवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

शिंदे गटातर्फे प्रथम गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री होते. शिंदे गटातील दादा भुसे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. भुसे यांनी यापूर्वी राज्याचे कृषिमंत्री म्हणून काम पहिले आहे. तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची संधी देण्यात आली. फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. महाविकास आघाडीमध्ये मध्ये मंत्रिपदाची संधी हुकल्याने ते नाराज होते.

ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असलेले उदय सामंत आणि फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री असलेले संदीपान भुमरे यांना शिंदे मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. एका तरूणीच्या मृत्यूनंतर वादात अडकल्यामुळे ठाकरे सरकारमधून राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले आहे.

शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००४, २०१४ आणि २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. ठाकरे सरकारमध्ये त्यांनी गृह, वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनाही या मंत्रिमंडळात संधी मिळाली. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या सत्तार यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून केले आहे.

भाजपचे रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिपदाची संधी देण्यात आली. तसेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. १९९५ पासून सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com