
MPSC News नगर : ‘‘कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगच जबाबदार आहे. त्यासंबंधी हक्कभंगाबाबत मी राज्यपालांना बोलणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत. याबाबत आम्ही लोकसेवा आयोगाला जाब विचारला आहे.
खरे तर मध्यंतरीच्या बाबीमुळे आयोगाच्या अध्यक्षाला पदावर राहण्याचा अधिकार नाही,’’ असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१-२०२२’ ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे.
मृदा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, दापोलीचे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात दहा दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारी (ता.३) आंदोलनाचा दहावा दिवस होता.
कुलगुरू डॉ. पाटील यांनी गुरुवारी (ता.२) आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना विद्यापीठाच्या प्रयत्नांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल माहिती दिली.
तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल त्यांना कळविले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनीही, कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगून लोकसेवा आयोगास जाब विचारला आहे.
‘‘कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शासनास थोडा वेळ देणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रश्नावर भेट घेऊन चर्चा केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
कृषी क्षेत्रातील विविध योजनांमध्ये कृषी अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नीती कशी चुकीची आहे, हे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले आहे,’’ असे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘अध्यक्षांचे काळेबेरे उघड’
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीस पात्र झालेल्या उमेदवारांसोबत फोटोसेशन केल्याचे व्हायरल झाले आहे.
अध्यक्षांनी या उमेदवारांशी का संपर्क केला, कशावरून या उमेदवारांचीच निवड होणार नाही, अध्यक्षांनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे जगजाहीर झालेले आहे. या अध्यक्षांना तत्काळ पदावरून मुक्त करावे, अशी आमची मागणी आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.