
नागपूर ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने लम्पी स्कीन (Lumpy Skin) प्रतिकारक लसीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जागतिकस्तरावर अशाप्रकारची ही पहिलीच लस असल्याने या माध्यमातून देशाचा गौरव वाढला आहे. देशांतर्गंत या लसीच्या उत्पादनाचा पहिला मान महाराष्ट्राला मिळणार आहे. त्या संदर्भातील करार केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupala) यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २९) विधानभवन परिसरात होईल.
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, उपायुक्त धनंजय परकाळे आदी या वेळी उपस्थिती राहतील.
राज्यात गोवंशीय पशुधनात लम्पी स्कीन आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंगळवार (ता.२७) पर्यंत ३० हजार ५४ जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली. अवघ्या २४ दिवसांत ७६ हजार ९८० जनावरे बाधित झाली. तर ६ हजार २१८ पशुधन मृत्यूमुखी पडले.
केंद्र सरकारकडून गोट पॉक्स या लसीचा उपयोग करीत देशभरात जनावरांचे लसीकरण करण्यात आले. याच लसीची परिणामकारकता ६५ ते ७० टक्के इतकीच होती. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधता येत नव्हता. केंद्र सरकारने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) या विषयीची जबाबदारी सोपविली. त्यांनी शासकीय व खासगी संस्थांच्या सहकार्याने लस विकसित केली आहे. ही लस प्रभावी ठरत असल्याचे निरीक्षण आहे. या लसीचे उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान देशात पहिल्यांदा महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले जाईल. तसा निर्णय केंद्र व राज्य सरकार स्तरावर घेण्यात आला.
‘‘भारतीय कृषी संशोधन परिषदेने लम्पी स्कीनवरील स्वतंत्र लस विकसित केली आहे. या लसीचे तंत्रज्ञान देशात सर्वात आधी महाराष्ट्राला मिळेल. त्याविषयीचा सामंजस्य करार आज (ता.२९) होईल. त्यानंतर पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत लसीचे उत्पादन होईल,’’ असे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त धनंजय परकाळे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.