
Pune News : राज्याच्या भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन (Water Conservation) होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने सोमवारी (ता. १७) हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी (Water Conservation) यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
गेल्या २०२२ मध्ये ३३ व्या क्रमांकावर असताना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील आणि या विभागाचे सचिव संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनामुळे आणि गेल्या वर्षभरात प्रकल्पाला दिलेल्या गतीमुळे राज्याने या वर्षी मूल्यांकनात अव्वल क्रमांक मिळविला.
राज्यामध्ये राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने २०१६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये विविध तांत्रिक बाबींवर आधारित प्रकल्प राबविण्यात येतात.
यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे ३३६ निरीक्षण विहिरींवरती स्वयंचलित संयंत्र बसवणे, मोबाईल व्हॅनद्वारे जलधर क्षमता चाचणीची माहिती प्राप्त करणे, राज्य भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राची उभारणी करणे, सर्वंकष शास्त्रीय बाबींची पायाभूत माहिती आधारे निर्णय आधार प्रणाली विकसित करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या माहितीचा उपयोग व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे.
या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने आढावा मिशनमध्ये राज्याचे भूजल आयुक्त श्री. जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये देशातील राज्य व केंद्र शासनाच्या एकूण ४९ अंमलबजावणी यंत्रणा आहेत. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून, पुढील टप्प्यामध्ये प्रकल्पाची वाटचाल होत आहे.
याकरिता अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प तसेच आधुनिक तंत्रज्ञान व प्रणालीवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. जोशी यांनी या बैठकीत दिली. ग्रामीण भागासोबतच शहरी भागात देखील भूजलाच्या व्यवस्थापनाकरिता या प्रणालीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.