
मुंबई : महावितरणच्या (Mahavitaran) नफ्याच्या भागांमध्ये अदानीसारख्या खासगी भांडवलदाराला वीज वितरण परवाना देणे आणि महाजनको आणि महापारेषणमध्ये खासगीकरण करण्याच्या विरोधात महावितरणचे दीड लाख कर्मचारी आज रात्री (ता. ४) १२ वाजेपासून ७२ तासांच्या संपावर (Mahavitaran Employees Strike) जाणार आहेत. अभियंते आणि वीज कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याने वीज वितरण प्रणाली कोलमडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथिगृहावर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची संघटनांसोबत बैठक होणार आहे. २ जानेवारी रोजी वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलन व संपाबाबत प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच इतर अधिकाऱ्यांसोबत ३१ संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली.
मात्र संघटनांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने चर्चा फिसकटली. त्यामुळे संघटना संपावर ठाम राहिल्या आहेत. संघटनांनी संपाची सूचना दीड महिन्यापूर्वी देऊनसुद्धा कुठलीही दखल घेतली नाही, याचे पडसाद बैठकीत उमटले.
ऊर्जामंत्री फडणवीस यांनीही या संपाकडे दुर्लक्ष केल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संपात उपकेंद्र सहायक, विद्युत सहायक, कनिष्ठ कार्यालयीन सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंते, ॲप्रेंटिस व ग्रामविद्युत सहायक सहभागी होतील.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण तयार
संपकाळात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली असल्याचे महावितरणने कळविले आहे. वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली आहेत.
कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५/१९१२/१९१२० यावर संपर्क साधावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.