
Dhule Railway Fund News ः केंद्रीय बजेटमध्ये मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा असलेल्या बोरविहीर ते नरडाणा या रेल्वेमार्गासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) महत्त्वाकांक्षी अमृत योजनेतून देशातील ३०० रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकीकरण होणार आहे. त्यात धुळे रेल्वे स्थानकाच्या पाठपुराव्यातून समावेश करून घेण्यात यश आले आहे.
त्यामुळे धुळे रेल्वे स्थानक कात टाकून अत्याधुनिक पद्धतीने सुशोभित आणि सर्व सुविधांनी सज्ज होणार आहे. धुळे मतदार संघात सर्वांत महत्त्वाचा मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आहे. या मार्गाला मंजुरी मिळवून घेत त्याचे प्रत्यक्षात काम सुरू करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहे.
त्या प्रयत्नांमुळेच मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून धुळे तालुक्यातील बोरविहीर ते शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा अशा ५० किलोमीटर लांबीच्या रेल्वेचे काम हाती घेण्यात आले आहे, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. आता प्रत्यक्ष रूळ टाकणे आणि रेल्वेमार्ग तयार करणे यासाठी निधीची आवश्यकता असल्याने तो निधी मिळवण्याचा प्रयत्न केंद्राकडे सुरू केला.
केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचे बजेट मंजूर केले जाते. त्यामुळे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेत त्यांना बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली.
त्यास यश मिळून २०२३-२०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी मंजूर बजेटमध्ये बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गासाठी १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.