साखरनिर्यात पोर्टलचा बोजवारा

सरकारने साखर कारखाने व निर्यातदार यांना नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम (एनएसडब्ल्यूएस) हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. पोर्टलवर माहिती भरताना तांत्रिक अडचणींमुळे कारखानदार व निर्यातदारांच्या नाकी नऊ येत आहेत. तांत्रिक सोपस्कार करून निर्यात होऊ शकत नसल्याचे चित्र आहे.
साखरनिर्यात पोर्टलचा बोजवारा
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : सुरळीत चाललेल्या साखरनिर्यातीत केंद्राने निर्बंधांचे अडथळे आणल्याने एक जूनपासून साखरनिर्यात ठप्प झाली आहे. निर्यात रिलीज ऑर्डर घेण्यासाठी सरकारने साखर कारखाने व निर्यातदार यांना नॅशनल सिंगल विंडो सिस्टिम (एनएसडब्ल्यूएस) हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. पोर्टलवर माहिती भरताना तांत्रिक अडचणींमुळे कारखानदार व निर्यातदारांच्या नाकी नऊ येत आहेत. तांत्रिक सोपस्कार करून निर्यात होऊ शकत नसल्याचे चित्र आहे.

मनस्तापाची मालिका

या पोर्टलवर एक जूनपासून साखर कारखाने व निर्यातदार साखरेची एक्स्पोर्ट रिलीज ऑर्डरकरिता माहिती भरण्याचे काम करत आहेत. निर्यातदारांना प्रत्येक स्वतंत्र करारासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे, तसेच कारखानदारांना सुद्धा प्रत्येक स्वतंत्र करारासाठी प्रत्येक वेळी नवीन प्रक्रिया राबवावी लागत आहे. कारखानदार व निर्यातदार यांना प्रथम लॉगीन करताना अडचणी आल्या, काहींची लॉगिन झाली व काहींना लॉगिन मिळाले नाही.

काहींचे डिजिटल सिग्नेचर अपलोड झाले नाही. ज्यांचे लॉगिन झाले, पण त्यांना सीआरएफ फॉर्म ओपन झाला नाही. ज्यांचा सीआरए फॉर्म ओपन झाला त्यांनी माहिती भरली. पण सबमिट बटण आल्यानंतर डिजिटल सिग्नेचर अपलोड झाले नाही. काही कारखानदार व निर्यातदार यांचे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर डिजिटल सिग्नेचर अपलोड झाले नाही. तर काहींचे ॲग्रिमेंट अपलोड झाले नाही. गेल्या पाच दिवसांपासून साखर निर्यातदार व कारखानदार माहिती भरण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.

शंकानिरसन करण्यासाठी नॅशनल सिंगल विंडो सिस्टिमवरील तक्रार निवारण नंबरवर विचारणा केली, तर तिथून व्यवस्थित माहिती मिळत नाही. अनेकांनी ई-मेलद्वारे ही माहिती विचारली, परंतु त्यालाही प्रतिसाद मिळत नाही. अनेकांनी आपल्याला येत असलेल्या अडचणींची किंवा आपण प्रयत्न करत असलेल्या अर्ज भरण्याचे प्रक्रियेचे स्क्रीन शॉट डी एफपीडीचे ईमेलवर पाठवले आहेत त्यांनाही तिथून काहीही प्रतिसाद नाही.

निर्यातदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये पाच जूननंतर मॉन्सूनमुळे जयगड बंदरातून साखर निर्यात करणे जिकिरीचे काम असते. आता मॉन्सून दारात आला आहे आणि निर्यातदार कारखान्यांमधून निर्यातीकरिता साखर वाहतूक करू शकत नाहीत, ती फार मोठी अडचण आहे. याचा सर्वांगीण विचार भारत सरकारचे खाद्य मंत्रालयाकडून करणे अतिशय गरजेचे आहे. वास्तविक पाहता भारत सरकारच्या खाद्य व वितरण मंत्रालयाला प्रत्येक महिन्यात साखर कारखानदारांकडून प्रोफार्मा २ अंतर्गत कारखान्यातून निर्यात होणारी साखर याची माहिती मिळत असते, तरीही सरकारने अचानक ही साखरनिर्यात रिलीज ऑर्डर प्रक्रिया राबवण्याचे निर्णय घेतले.

काहींनी केले रेल्वे करार रद्द

बऱ्याच निर्यातदारांनी २५ मेपासून आपले रेल्वे इन्डेट रद्द केल्या आहेत. कारण एक जूननंतर रेल्वे जर बंदरावर पोहोचली तर कस्टमद्वारे साखर उतरण्यास अडचणी येतील. आधीच निर्यातदारांना वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वेचे प्रीमियम इन्डेट जादा १५ टक्के भाडे देऊन रेल्वेकडे आगाऊ मागणी केली आहे. बऱ्याच रेल्वे स्टेशनवर २० ते ३० पेंडिंग इन्डेट आहेत. अशावेळी निर्यातदारांना मिळणारी रेल्वे रद्द करावी लागत आहे. बऱ्याच निर्यातदारांनी निर्यातीकरिता साखर उचलण्यासाठी कारखानदारांना पेमेंट केले आहे, परंतु अचानक आलेल्या या नवीन निर्यात रिलीज धोरणामुळे साखर उचल करू शकत नाहीत.

...असे हवे धोरण

निर्यात रिलीज ऑर्डर धोरण हे देशांतर्गत साखरेचे भाव वाढतील तसेच देशांतर्गत साखरेचा साठा कमी होईल या भीतीपोटी अचानक योजना लागू केली. या ऐवजी सरकारने जर देशांतर्गत राखीव साखर कोटा जेवढा आवश्यक आहे तो सर्व कारखान्यांना ३० सप्टेंबर अखेर कारखानानिहाय राखीव साखर कोटा देणे योग्य होईल.

मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२१ मध्ये ज्या वेळी देशांतर्गत साखरेचे भाव वाढू लागले, त्या वेळी खाद्य मंत्रालयाने देशांतर्गत अतिरिक्त मासिक कोटा देऊन साखरेचे दर नियंत्रणात आणले होते, त्यामुळे देशांतर्गत साखरेचे भाव वाढत असताना सरकार मासिक अतिरिक्त कोटा देऊन साखरेचे दर नियंत्रणात ठेवू शकते, त्यामुळे सरकारने वरील दोन बाबींचा विचार करून साखरनिर्यात निर्बंधमुक्त करावी व कारखानानिहाय राखीव साखरेचा कोटा ही नवीन संकल्पना राबवून निर्यातदार व कारखानदार यांना साखरनिर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे.

बऱ्याच कारखानदारांनी एप्रिल व मे महिन्यात साखरनिर्यातीचे करार केले, परंतु एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर ते माहिती भरू शकत नाही त्यांना याबाबतीत सरकारने कोणत्याही प्रकारचे क्लॅरिफिकेशन दिलेले नाही.

सरकारने एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर माहिती भरण्याऐवजी पूर्वीप्रमाणे फक्त ई-मेलद्वारे कारखाने व निर्यातदार यांच्याकडून साखर एक्स्पोर्ट रिलीज ऑर्डरकरिता मागणी पत्र, तसेच संबंधित निर्यात करार मेलद्वारे पाठवल्यानंतर लगेचच रिलीज ऑर्डर द्यावी. अशी मागणी निर्यातदारांची आहे. असे झाल्यास मागील आठ ते दहा दिवस निर्यात साखरेची वाहतूक थांबली आहे ती सुरळीत होईल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

कारखानदार आणि निर्यातदारांना एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर माहिती भरताना अडचणी येत आहेत. सरकारने याबाबत काय धोरण अवलंबणार याची माहिती देणे आवश्यक आहे. जर प्रथम येणाऱ्या अर्जास प्राधान्य असे धोरण अवलंबले तर ज्यांनी निर्यात करार पूर्वी केले आहेत. परंतु एनएसडब्ल्यूएस पोर्टलवरील त्रुटीमुळे ते अर्ज करू शकले नाहीत अशांचे काय हाही प्रश्‍न आहे.

अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com