
पुणे : देशात सन १९३२ मध्ये शास्त्रज्ञ एल. ए. रामदास (L. A. Ramdas) यांनी सर्वप्रथम हवामानशास्त्राच्या अभ्यासाची (Meteorology Study) सुरुवात पुणे कृषी महाविद्यालयात (Agriculture College) केली. त्यासाठी ऊस पिकाची (Sugarcane Crop) निवड केली. एवढेच नव्हे तर हवामानशास्त्राच्या अभ्यासावरील पहिला संशोधन पेपरसुद्धा पुण्यातच प्रकाशित केला होता, अशी माहिती कामधेनू पशुवैद्यकीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी दिली.
पुणे कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागात ‘पिकांचे सूक्ष्म हवामानशास्त्र’ या विषयावरील देशभरातील शास्त्राज्ञांकरिता २१ दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन गुरुवारी (ता. १) करण्यात आले. हे प्रशिक्षण राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी माजी कुलगुरू डॉ. वार्ष्णेय, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत जाधव आदी उपस्थित होते.
श्री वाष्णेय म्हणाले, की कृषी हवामानशास्त्र विभागाचा पुण्यातील स्थापनेच्या संघर्ष हा अडचणीचा होता. कालांतराने त्याचे महत्त्व वाढत गेल्याने अनेक बदल करण्यात आले. आता हवामान हा मुख्य विषय बनला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने नत्र, स्फुरद, पालाश, जमिनीची विद्युत वाहकता, सामू, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब इ. अनेक बाबींचा समावेश करून हवामानशास्त्रातील नवीन प्रारूप तयार करण्याची आवश्यकता आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, की वातावरण व हवामान हे मानवी जीवनातील प्रत्येक घटक तथा पैलूंवर परिणाम करत असून, अन्न, वस्त्र व निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा असून, त्या पूर्णतः हवामान व भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत आहे.
या दृष्टिकोनातून शेतीकडे बघितले असता जमिनीच्या पूर्वमशागतीपासून ते शेतीमाल विक्री या संपूर्ण साखळीमध्ये हवामानाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, तापमान, पर्जन्य, वारा, सूर्यप्रकाश हे हवामानाचे घटक पिकांच्या वाढ व विकासासाठी अत्यावश्यक आहे. पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या तीन मूलभूत गरजांमध्ये माती, बियाणे व हवामानाचा समावेश होतो. हवामानशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व प्रशिक्षण केंद्राचे निर्देशक डॉ. विजय स्थूल यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन डॉ. प्रांजली बगाडे यांनी केले.
शेतकऱ्यांमध्ये बदलत्या हवामानाविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पिकांच्या सूक्ष्म हवामानाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बदल हा त्रिकालाबाधित सत्य असल्याने आपण हवामानात बदल घडवून आणू शकत नसल्याने बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डॉ. एम. सी. वार्ष्णेय, माजी कुलगुरू, कामधेनू पशुवैद्यकीय विद्यापीठ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.