
नांदेड : मानवी जीवनात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व (Importance Of Millets) आहे. पौष्टिक तृणधान्यात ज्वारी (Jowar), बाजरी (Pearl Millet), नाचणी (Ragi), वरई, राळा, राजगिरा हे पिके येतात. या तृणधान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शिअम, झिंक, आयोडीन इ. पोषक घटक मिळतात.
हे पोषक घटक प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचा प्रत्येकांच्या आहारात समावेश अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हा परिषदेत मंगळवारी (ता. १७) पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले, कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमनशेट्टे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
तर दृरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका महिला व बालविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
पौष्टिक तृणधान्य दिन अधिक व्यापक व्हावा यासाठी जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाची विक्री व जनजागृतीवर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून याबाबत अधिक व्यापक उपक्रम घ्यावेत, असे आवाहन वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाने संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या वेळी रविशंकर चलवदे यांनी तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना तानाजी चिमनशेट्टे यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.