मोदींनी ग्रामविकासाची नवी दृष्टी दिलीः अमित शाह

शेती स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकरी उत्पादन वाढवतील, परंतु विपणनासाठी सहकारी संस्था हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे शाह म्हणाले.
मोदींनी ग्रामविकासाची नवी दृष्टी दिलीः अमित शाह
Amit ShahaAgrowon

"पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशासमोर 'आत्मनिर्भर भारताचा' (Atmanirbhar Bharat) दृष्टिकोन मांडला. जेव्हा आत्मनिर्भर गावांची संख्या वाढेल तेव्हाच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. गाव आत्मनिर्भर करण्यासाठी ग्रामविकास अत्यावश्यक आहे," असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी मांडले. गुजरातमधील ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंदच्या (IRMA) 41 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते रविवारी (ता. १२) बोलत होते.


शेती स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकरी उत्पादन वाढवतील, परंतु विपणनासाठी सहकारी संस्था हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे शाह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी यांनी सहकार मंत्रालय स्थापन केले. देशाच्या ग्रामविकासात हे मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात महात्मा गांधींचा उल्लेख करताना गृहमंत्री शाह म्हणाले, "भारताचा आत्मा खेड्यात राहतो. म्हणून जर भारताला समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण करायचे असेल तर आधी खेड्यांना समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे गांधीजी म्हणत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये नेमके याच दिशेने प्रयत्न सुरु केले. त्यांनी देशाला आणि जगाला ग्रामविकासाची एक नवी दृष्टी दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या आठ वर्षांत व्यक्तीच्या, गावाच्या आणि प्रदेशाच्या विकासासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पूर्वी 60 कोटी लोकांचे बँकेत खातेही नव्हते. ते अर्थव्यवस्थेशी जोडलेही गेले नव्हते. आज मात्र गेल्या आठ वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे बँकेत खाते नसलेले एकही कुटुंब नसेल."

गांधीजींनंतर खादीचा विसरच पडला होता, परंतु आता पंतप्रधानांनी प्राधान्य दिल्यामुळे खाडी ग्रामोद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असल्याचे शाह यांनी सांगितले. शेतीला स्वयंपूर्ण केल्याखेरीज गावांचा संपूर्ण विकास शक्य नाही. हे लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना कर्जे घ्यावी लागणार नाहीत, याचीही काळजी पंतप्रधानांनी घेतली आहे. देशातील ७५ टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरापेक्षाही कमी जमीन आहे. दोन एकर जमीन कसण्याचा-पिकवण्याचा किमान खर्च सहा ते सात हजाराच्या घरात जातो. हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी एक व्यवस्था बसवली. त्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी 6,000 रुपये वितरित केले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार नाही, असेही शाह म्हणाले.

ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणांद (IRMA) येथील विद्यार्थ्यांना उद्देशून शाह म्हणाल, "आज पदव्या संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आयुष्यभर ग्रामविकासासाठी काम करत राहावे, कारण तसे योगदान देण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. आपल्या संस्थेला तुम्ही गुरुदक्षिणा देऊन आयुष्यभर तुमची दृष्टी ग्रामीण विकासाकडे लागलेली असेल आणि खेडोपाडीच्या गरिबांना सुखी समृद्ध करण्यात तुम्ही जीवन गुंतवून ठेवाल, अशी प्रतिज्ञा घ्यावी."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com